- पांडुरंग आहिरे (तळवाडे दिगड, सटाणा)
आॅक्टोंबर महिना सुरू होताच नाशिक जिल्ह्याचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. आॅक्टोबर हीटपासून आपल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी बागायतदारांना मोठी कसरत करावी लागते. तीव्र उन्हामुळे द्राक्षमणी जळू नयेत म्हणून बागांवर वेगवेगळ्या प्रकारे सावली निर्माण करावी लागते. अनेक शेतकरी ग्रीन शेडनेटचा वापर करतात याला एकरी सुमारे ३० ते ४० हजारांचा खर्च येतो. पहिल्याच वर्षी बाग धरणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र हे परवडणारे नसते.
नाशिक जिल्ह्यातील बागाला तालुक्यातील तळवाडे दिगर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुनील आहिरे यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या खर्चाला फाटा देत अगदी अल्प खर्चात द्राक्षबागेवर सावली निर्माण केली आहे. यासाठी त्यांनी साड्यांचा आधार घेतला आहे. बरेच शेतकरी बागेवरती सावलीसाठी ग्रीन शेडनेटचा वापर करतात. शेडनेटसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. या खर्चाला पर्याय म्हणून सुनील आहिरे यांनी वेगळी शक्कल लढवली. त्यांनी मालेगाव येथून १० रुपये प्रति नगाप्रमाणे ३०० साड्या आणल्या.
या साड्यांचे त्यांनी द्राक्षबागेवर आच्छादन करून द्राक्ष मण्यांवर सावली निर्माण केली आहे. द्राक्षबागेवरील हा रंगीबेरंगी नजराणा जाणाऱ्या-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना असे वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. जुन्या साड्यांच्या वापरामुळे शेडनेटसाठी करावा लागणारा खर्च करण्याची गरज नाही.
यामुळे नव्याने तयार होणाऱ्या कोवळ्या पानांवर सनबर्नचा परिणाम होत नाही. सनबर्नमुळे उत्पादनात तीस ते चाळीस टक्के होणारी घट कमी करता येऊ शकते. तसेच एक्स्पोर्ट दर्जाचा माल तयार करण्यास मदत मिळते. चित्रा नक्षत्र कोरडे गेल्याने पावसातून मिळणारे नैसर्गिक नत्र वाचवण्यास मदत होते, असे सुनील आहिरे सांगतात.