नाशिक : शेतकरी राजाचा खरा साथीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय संस्कृतीत पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुरुवारी (दि.१) शहर परिसरातदेखील पोळा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात तसेच शहरात ज्या भागात शेती केली जाते अशा ठिकाणी गुरुवारी सकाळीच बैलांना स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. यानंतर बैलांच्या शिंगांना आक र्षक रंगांनी रंगवून त्यामध्ये बाशिंग अडकविण्यात आले. तसेच विविध आकारांचे गोंडे, बैलांच्या अंगावर पांघरलेली शाल अशा आकर्षक पद्धतीने बैलांना सजविण्यात आले होते. यानंतर बैलांचे औक्षण करून त्यांना पुरणा- वरणाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यंदा चांगले पर्जन्यमान झाल्याने मागील वर्षीच्या दुष्काळाच्या कटू आठवणींना तिलांजली देत शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला.एकीकडे शेतकऱ्यांकडून खऱ्या बैलांची पूजा केली जात असताना शहरात घरोघरी मातीच्या बैलांची पूजा करण्यात आली. यावेळी मातीच्या बैलांच्या शिंगांमध्ये कणकेचे बाशिंग अडकवून तसेच बैलांना खीर, पुरी आणि पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी सुवासिनींनी पिठोरी अमावस्येची कहाणी वाचून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला. पिठोरी अमावस्येचा दिवस मातृदिन म्हणूनही साजरा केला जात असल्याने मातृदिनानिमित्त आईने आपल्या मुलाला खीर, पुरीचे वाण देत आशीर्वाद दिले. आपली अपत्ये दगावू नये यासाठी चौसष्ट योगिनींची पूजा करण्याची आख्यायिका असल्याने महिला भाविकांनी चौसष्ट योगिनींची पूजा केल्याचे चित्रही गुरुवारी बघायला मिळाले. गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतलेल्या बैलांची संध्याकाळी वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)
सर्जा-राजाची जोडी खिल्लारी
By admin | Published: September 02, 2016 12:29 AM