नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले किशोर दराडे यांनी सोमवारी मुंबईत शिवसेना नेत्यांची भेट घेतली, त्यानुसार त्यांना या पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी यंदा पाच ते सहा इच्छुक असून, सर्वाधिक इच्छुकांची संख्या शिक्षक लोकशाही आघाडी म्हणजेच टीडीएफकडे आहे. सोमवारी संघटनेचे अध्यक्ष फिरोज बादशाह यांच्या उपस्थितीत रावसाहेब कचरे यांचा अर्ज भरण्यासाठी टीडीएफने शक्तिप्रदर्शन केले तसेच कचरे हेच अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु संदीप बेडसे, शालिग्राम भिरुड यांनीही आपल्याला टीडीएफचा पाठिंबा असल्याचा दावा करून प्रचाराला सुरुवात केली आहे. टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेने शिक्षक मतदारसंघात उमेदवारदेण्याचे यापूर्वीच जाहीर केले व त्यासाठी किशोर दराडे तसेच संजय चव्हाण यांच्या नावांची चर्चाही घडवून आणली. त्यातही दराडे यांच्या नावाची चर्चा अधिक करण्यात आली. परंतु शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक असतानाही शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होत नसल्याचे पाहून घालमेल होत असलेल्या दराडे यांनी सोमवारी मुंबई गाठून सेनेच्या नेत्यांच्याभेटीगाठी घेतल्या. सायंकाळी उमेदवारी घोषित करण्यात आली.
सेनेकडून दराडेंच्या नावाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:32 AM