लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व शासनाच्या विविध योजनेंतर्गत विविध विकासकामांना प्राधान्य देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करत नागरिक आणि पदाधिकारी यामधील समन्वयक म्हणून काम करून मानूर गट समस्यामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जि. प. सदस्य डॉ. भारती पवार यांनी ग्रामसेवक व अधिकाऱ्यांना केले. पंचायत समिती सभागृहात मंगळवारी झालेल्या मानूर गटाच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ पवार बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, पंचायत समिती सदस्य मीनाक्षी चौरे, माजी सभापती ,अॅड. संजय पवार, प्रवीण पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत मानूर गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सरपंचांनी ग्रामसेवक विश्वासात न घेता काम करत असल्याची तक्रार करत ग्रामसेवकांच्या विरोधातच पाढा वाचला. यावेळी डॉ. भारती पवार यांनी प्रत्येक ग्रामपंचायतनुसार आढावा घेत ग्रामसेवक व सरपंचांकडून प्रत्येक गावात कुठले काम सुरू आहे व आगामी काळात कोणती कामे गरजेची आहेत याबाबत माहिती जाणून घेतली. सरपंचांनी कामाची माहिती द्यायची आणि ग्रामसेवकांनी कामांची आजची स्थिती, नवीन कामांसंदर्भात दाखल केलेले प्रस्ताव किंवा प्रस्ताव कधीपर्यंत तयार करून दाखल होतील याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीस नारायण हिरे, बाळासाहेब पवार, संभाजी पवार, वाय. एस. देशमुख, अमित देवरे, प्रवीण रौंदळ, अमोल पगार, रुपेश शिरोरे, किरण पाटील आदींसह सरपंच व ग्रामसेवक आदींसह प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसेवकांविरोधात सरपंचांच्या तक्रारी
By admin | Published: June 29, 2017 12:47 AM