कोरोनामुळे गावोगावी ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ध्वजारोहणास सरपंच तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना या सोहळ्यापासून मुकावे लागले होते. ग्रामसेवक व मोजक्याच शिक्षकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा सोहळा गेल्या दीड वर्षात आटोपता घेण्यात आला होता. परंतु आता सरपंच व गाव प्रमुखांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करावा, असे शासनाचे निर्देश आहेत. विभाग व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार असून, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात यावे, अशा शासनाने सूचना दिल्या आहेत.
चौकट ===
सुरक्षित अंतर, मास्क बंधनकारक
स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करताना केल्या जाणाऱ्या ध्वजारोहण समारंभात कोरोना विषाणूची काळजी घेण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत. ध्वजारोहण कार्यक्रमात सुरक्षित अंतर पाळण्याचे तसेच सर्वांसाठी मुखपट्टी बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळले जातील याची काळजी आयोजकांवर निश्चित करण्यात आली असून, सदर सोहळा अधिकाधिक नागरिकांना पाहता यावा यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.