गंगापूर : नाशिक तालुक्यातील जलालपूर व महादेवपूर या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी प्रथमच जनतेतून थेट निवडणूक घेण्यात आल्याने दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. यात जलालपूरच्या सरपंचपदी हिराबाई भगवान गभाले यांची, तर महादेवपूरच्या सरपंचपदी विलास सांडखोरे हे निवडून आले. दरम्यान, ग्रामस्थांनी गुलाल उधळून जल्लोष केला. प्रथमच सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्यात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. जलालपूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असल्याने हिराबाई गभाले व जिजा डंबाळे यांच्यात लढत झाली. यात हिराबाई गभले यांनी ८५१ मते मिळवत थेट जनतेतून सरपंचपदी निवडून येण्याचा मान मिळविला, तर महादेवपूर ग्रामपंचायतीत विकास पॅनलचे विलास सांडखोरे यांनी बाजी मारली. महादेवपूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित होते. यात दौलत डावरे व विलास सांडखोरे यांच्यात चुरशीची लढत होऊन विलास सांडखोरे यांनी थेट जनतेतून सरपंच होण्याचा बहुमान मिळविला. जलालपूर व महादेवपूर या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये तीन प्रभाग असून, सरपंचासह एकूण नऊ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली.
जलालपूरच्या सरपंचपदी गभाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:20 AM