कसबे सुकेणे : येथील ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदाच्या चुरशीच्या लढतीत छगन जाधव विजयी झाले तर धनंजय भंडारे यांचा एका मताने पराभव झाला. शासनाने सरपंचाला बहाल केलेल्या दोन मतांच्या अधिकारातून उपसरपंचांची निवड झाली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी दोन मतांचा अधिकार वापरण्याचा योग राज्यात प्रथमच कसबे सुकेणे ग्रामपालिकेच्या सरपंच गीता गोतरने यांच्या माध्यमातून आला आहे.कसबे सुकेणे ग्रामपालिकेत सत्तेचे गणित अगदी काठावर होते. गतवर्षी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, विश्वास भंडारे यांच्या गटाला जनतेतून सरपंचपद आणि आठ जागा तर राष्ट्रवादीचे नाना पाटील यांच्या गटाने नऊ जागा पटकाविला होत्या. त्यामुळे सत्तेचे गणित जुळवतांना या ग्रामपालिकेत सत्ता संघर्ष पाहावयास मिळत होता. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी आवर्तनानुसार भंडारे गटाने सविता जाधव यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर जाधव गटाकडून छगन जाधव आणि भंडारे गटाकडून राष्ट्रवादीचे छगन जाधव यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केला. मतदान प्रक्रि येत धनंजय भंडारे यांना सविता जाधव, धनंजय भंडारे, आरती कर्डक, सुरेखा औसरकर, अतुल भंडारे, अबदा सय्यद, रमेश जाधव, मनीषा भंडारे, सोमनाथ भागवत या नऊ सदस्यांनी मतदान केले तर छगन जाधव यांना सरपंच गीता गोतरणे, बाळासाहेब कर्डक, छगन जाधव, सुहास भार्गवे, छबु काळे, ज्योती भंडारे, शिल्पा जाधव, छाया गांगुर्डे, सरला धुळे या नऊ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे दोहोंना समसमान मते झाल्याने शासनाने बहाल केलेल्या दुसऱ्या मताचा हक्क विद्यमान सरपंच गोतरने यांनी बजावत छगन जाधव यांना मतदान केले. त्यामुळे कसबे सुकेणे ग्रामपालिकेचे सरपंचासह उपसरपंचपदही शिवसेनेने हस्तगत केले आहे.
सरपंचाने बजावला दोन मतांचा अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 5:58 PM
कसबे-सुकेणे : उपसरपंचपदी छगन जाधव विजयी
ठळक मुद्देउपसरपंच पदाच्या निवडीसाठी दोन मतांचा अधिकार वापरण्याचा योग राज्यात प्रथमच कसबे सुकेणे ग्रामपालिकेच्या सरपंच गीता गोतरने यांच्या माध्यमातून आला आहे.