सटाणा : तालुक्यातील संवेदनशील गाव अशी ओळख असणारे कौतिकपाडा हे गाव. या गावचे सरपंच राजेंद्र जाधव यांनी कोरोनाने दगावलेल्या दोघांवर स्वतः अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करत माणुसकीचे दर्शन घडविले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून गाव कसे वाचेल त्यासाठी कोरोनाशी दोन हात करण्याची सरपंच राजेंद्र जाधव तयारी दाखवली. गावात काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून तत्काळ गावात प्रत्येक घरात सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने कायमस्वरूपी पंप खरेदी केला. मराठी शाळेत दोन खोल्यामध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. शासनाच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करण्यासाठी जनजागृती केली .
सरपंच जाधव हे रुग्णांना स्वतः नेऊन रुग्णालयात दाखल करतात. दि.२१ एप्रिल रोजी गावातील एका महिलेचे कोरोनाने निधन झाले. या रुग्णाच्या अंत्यविधीची चिंता भेडसावत असतानाच सरपंच जाधव यांनी स्वत: पीपीई किट परिधान करत त्या महिलेचा अंत्यविधी केला. त्याच दिवशी गावातील एका निराधार व्यक्तीचे अपघाती निधन झाले. गावचे सरपंच या नात्याने जाधव यांनी स्वतः घागर उचलली आणि त्या मृतात्म्यास पाणी दिले. संकट काळात राजकारण बाजूला ठेवून गावाचा प्रमुख या नात्याने रुग्णसेवा बजावणाऱ्या सरपंच जाधव यांच्या या कार्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.