तब्बल एक महिन्यापूर्वी तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका पार पडल्या आहेत. मतमोजणीनतंर सर्वांच्या नजरा सरपंच आरक्षणाकडे लागल्या होत्या. २८ जानेवारीला जात प्रर्वगनिहाय आरक्षण जाहीर झाले. त्यानतंर ५ फेब्रुवारीला महिला आरक्षणही जाहीर झाल्याने तालुक्याच्या नजरा सरपंचपदाच्या तारखेकडे लागले होते. सरपंच निवडीच्या तारखा जाहिर होण्यापूर्वीच अनेक गावांतील सदस्य बाहेरगावी गेले होते. त्यातच आठ दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीसाठी स्थगिती मिळाल्याने सरपंचपदाची दावेदारी असणाऱ्यांचा जीव बुचकळ्यात पडला आहे.
-----------------
सरपंच होणाऱ्या नवनिर्वाचित सदस्यांना महिला आरक्षणाचा तर काही सदस्यांना स्थगितीचा फटका बसला आहे. त्यामुळे ज्या सदस्यांची सरपंचपदासाठी दावेदारी आहेत ते आपल्या निवडीसाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. तालुक्यातील सर्वच निवडणुका नेहमीच अटीतटीच्या व चुरशीच्या होतात. तालुक्यात पक्षीय पातळीपेक्षा स्थानिक व वैयक्तीक पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढवल्या गेल्या. अनेक गावांमध्ये वार्डनिहाय पॅनल तयार करून निवडणुका पार पडल्या. बहुतांश गावांमध्ये सत्तारूढ गटाला युवक वर्गाकडून पराभवाचा सामना करावा लागला. तब्बल सात ते आठ महिने कोरोना महामारीमुळे स्थानिक संस्थांच्या निवडणूका लांबल्याने गावपातळीवर कार्यकर्ते नाराज झाले होते. कोरोनाचे नियम पाळून प्रशासनाने जानेवारी महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका शांतेत पार पडल्या.
---------------------------
नवनिर्वाचित सदस्य निवडून येवून महिन्याचा कालावधी उलटला आहे. सरपंचपदाची दावेदारी असणाºया प्रमुखांकडून सदस्यांना सांभाळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सरपंचपदाच्या आरक्षणासंदर्भात न्यायालयाने जिल्हाधिकाºयांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहेत. लवकरात लवकर सरपंचपदाच्या तारखा जाहिर होण्याची अपेक्षा सदस्य करताना दिसत आहे.
----------
सदस्य देवदर्शनाला
तालुक्यातील बहुतांश गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका अटीतटीच्या होवून अनेक ठिकाणी काठावरचे बहुमत आहे. तर काही भागात महिला आरक्षणामुळे अंदाज बिघडले आहेत. त्यामुळे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सहलीला पाठवण्यात आले आहे. त्यामुळे सदस्य देवदर्शन व सहलीचा मनमुराद आंनद घेत असल्याचे चित्र आहे.