नाशिक : राज्यातील २८ हजार ५०० सरपंचांचे थकीत चार महीन्यांचे मानधन सरकारने सरपंचांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. बी.के.टी. टायर प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्डच्या तिसऱ्या पर्वात आयोजित ‘सरपंच खरा योद्धा’ या चर्चासत्रात सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरु षोत्तम घोगरे पाटील यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हा मानधनाचा प्रश्न मांडला होता.
‘लोकमत’च्या माध्यमातून सरपंचांचा हा प्रश्न तीनच दिवसात मार्गी लागल्याने सरपंच सेवा महासंघाने समाधान व्यक्त केल्याची माहिती सोशल मिडिया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर यांनी दिली. ‘सरपंच खरा योद्धा’ या वेबिनारमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह भास्करराव पेरे पाटील, पोपटराव पवार, माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी ,पुरु षोत्तम घोगरे आदी सहभागी झाले होते. यावेळी सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरु षोत्तम घोगरे पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे कोरोना संसर्गाच्या पाशर््वभूमीवर सरपंच आपला जीव धोक्यात घालून कामकाज करत असून सरपंच आणि संगणक परीचालक यांच्या मानधनासाठी आग्रह धरला होता. मुश्रीफ यांनी सरपंच सेवा महासंघाचे मागणीची दखल घेऊन प्रशासनास सूचना दिल्या. त्यानुसार अवघ्या तीनच दिवसात राज्यातील २८ हजार ५०० सरपंचांचे डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० पर्यंतचे चार महिन्यांचे देय असलेले मानधन सरपंचांच्या बॅक खात्यांमध्ये वर्ग केले आहे. मानधन जमा झाल्यामुळे राज्यातील सरपंच यांनी त्याचे श्रेय ‘लोकमत’च्या या व्यासपीठाला दिले आहे. याबाबत सरपंच सेवा महासंघाने समाधान व्यक्त केले आहे.