सटाणा : कुलदीप जाधव अमर रहेचा जयघोष... कुटुंबीयांचा आक्रोश, जवानांनी दिलेली अखेरची सलामी आणि शोकसागरात बुडालेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२४) साश्रूनयनांनी पिंगळवाडे येथील शहीद जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
गेल्या शनिवारी सुटी टाकून घराकडे निघालेले कुलदीप जाधव हे मुक्कामी असलेल्या कारगिल सेक्टरमध्ये सकाळी मृतावस्थेत आढळून आले होते. आकस्मित मरण पावलेल्या जाधव यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी १० वाजता सटाणा येथे आणण्यात आले. यावेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कुलदीप यांना पुष्पांजली वाहण्यात आली. त्यानंतर ताहाराबाद रस्ता या प्रमुख मार्गाने त्यांच्या भाक्षी रोडवरील राहत्या घरी पार्थिव आणण्यात आले. अर्धा तास अंतिम दर्शनासाठी कुलदीपचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यांच्या घरापासून राहत्या गावी पिंगळवाडे येथे वैकुंठ रथावर त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. औंदाणे, तरसाळी, वीरगाव, करंजाड येथील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पिंगळवाडे येथे अंत्ययात्रेवेळी नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. उपस्थितांनी कुलदीप यांच्या पार्थिवावर पुष्पहार आणि फुले वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी ‘अमर रहे अमर रहे कुलदीप जाधव अमर रहे’..‘भारत माता की जय.. वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्या जात होत्या.
अंत्यसंस्कारस्थळी पार्थिव येताच खासदार डॉ. सुभाष भामरे,आमदार दिलीप बोरसे, प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा पारधी, देवेंद्र शिंदे, मविप्र समाजाचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, पिंगळवाडेच्या सरपंच लताबाई भामरे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी कुलदीप जाधव यांच्या परिवाराची वैद्यकीय सेवा मोफत करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.