नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विहितगाव येथे होत असलेल्या दगडफेकीच्या प्रकरणात भानामतीसारखी कोणताही अंधश्रद्धेचा प्रकार नसल्याचे स्पष्ट करतानाच दगडफेक ही विकृत अभिव्यक्ती आहे, ती करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी सॅटेलाइट स्कॅनिंग करून परिस रातील हालचाली टिपाव्या अशी सूचना महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. पुढील आठवड्यात समितीचे कार्यकर्ते प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देणार आहेत. विहितगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून घरांवर दगडफेक होत असून, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. काहींनी हा भानामतीचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले तर काही टवाळखोरांवरांचा उद्योग असल्याचे सांगत आहेत. सर्व तपास करूनही दगडफेकीचे उद्योग करणारे सापडत नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली असल्याचे दिसते आहे. या प्रकाराबाबत मात्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा भानामतीचा कोणताही प्रकार नसून टवाळखोर किंवा परिसरातील दुखावलेल्या व्यक्तीचे हे काम असावेत, असा दावा केला आहे. समितीचे जिल्हा कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी यासंदर्भात सांगितले की, यापूर्वी भानामती हा प्रकार मुळातच विज्ञानला धरून नसल्याने अंधश्रद्धा बाळगण्याचे कारण नाही. घरांच्या पत्रावर दगडफेक केल्याने आवाज होतो आणि नागरिक घाबरतात. त्यामुळे व्यक्तीच्या अंगावर दगडफेक करण्यापेक्षा जाणीवपूर्वक घरांच्या छतांवर दगडफेक केली जाते आहे. ज्या विविध भागातून आणि वेळी अवेळी दगड घेतात, त्याचा शोध घेतला तर दगडफेक करणारे गोफण किंवा तत्सम साधनांचा वापर करीत असावेत, असे दिसते आहे. त्यामुळे आता सॅटलाइट स्कॅनिंग करून संबंधितांचा शोध घेण्याची आहे. सॅटेलाइट स्कॅनिंगमध्ये हालचाली स्पष्ट दिसु शकतील, असेही त्यांनी सांगितले. पुढील आठवड्यात महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पथक प्रत्यक्ष जागेवर जाऊन या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही दातरंगे यांनी सांगितले.
दगडफेकीच्या शोधासाठी ‘सॅटेलाइट स्कॅनिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:50 AM