नाशिक : राज्यभरात कोरोनाच्या थैमानाला प्रारंभ झाल्यापासून भारतीय जैन संघटनेसह स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ आणि ‘मोबाइल डिस्पेन्सरी’च्या माध्यमातून २० लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. त्यामुळेच घरोघर जाऊन तपासणी, संशयित तसेच रुग्णांचे वेळीच निदान होऊन पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची ठरली. त्यामुळेच धारावीसह मालेगावचे हॉटस्पॉट नियंत्रणात आणण्यात योगदान देऊ शकल्याचे समाधान असल्याचे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सांगितले.भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून (बीजेएस) एप्रिल महिन्यापासून राज्यभरात २५०हून अधिक रुग्णवाहिका महाराष्टÑात अधिकाधिक कंटेन्मेंट झोनमध्ये फिरून सातत्याने वेळीच संशयित, बाधित रुग्ण शोधण्यात योगदान देत आहेत. कोरोनाच्या रुग्णांना वेळीच शोधून त्यांना दाखल केल्याने त्यांच्यापासून होऊ शकणारी संभाव्य वाढ रोखण्यात बीजेएसचे योगदान खूप मोलाचे ठरत आहे. नाशिकमध्येदेखील बीजेएसने तीन दिवसांपूर्वीच ‘मिशन झिरो नाशिक’ अभियानाला प्रारंभ केला असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश.प्रश्न- बीजेएसच्या आतापर्यंतच्या अभियानामागील विचार आणि त्यात सातत्य ठेवणे कितपत अवघड होते?मुथा- कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागल्यानंतर त्याविरोधात काही ठोस अभियान राबविण्याचा निर्धार बीजेएसने केला. त्यामागे एकच विचार होता की कोरोनाला लवकरात लवकर हद्दपार करण्यात आपले योगदान देणे. या अभियानासाठी अत्यंत गांभीर्यपूर्वक नियोजन करण्यात आले. या प्रक्रियेतील कोरोनाबाधित शोधणे आणि बाधितांवर उपचार असे त्यातील दोन टप्पे आहेत. त्यातील पहिला टप्पा हा नॉनमेडिकल व्यक्तीदेखील करू शकत असल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांसह त्याच प्रक्रियेत योगदान देण्याचे निश्चित केले. या अभियानात डॉक्टरांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग मिळविणे आणि त्यात सातत्य राखणे ही सर्वाधिक अवघड जबाबदारी होती. मात्र, डॉक्टरांसह सर्वांना प्रेरित करून सर्वांना बरोबर घेऊन कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.प्रश्न- कोरोना रोखण्यासह या आजाराची भीती जनतेच्या मनातून काढण्यावर संघटनेचा भर अधिक आहे का?मुथा- कोरोना हा आजार होण्यापासून प्रत्येकाला वाचविणे हे तर संघटनेच्या अभियानाचे उद्दिष्ट आहेच. मात्र, त्याचबरोबर कोरोना हा लगेच संपुष्टात येणार नसल्याने किमान समाजमनातील त्याची दहशत संपुष्टात आणण्यावर संघटनेच्या माध्यमातून भर दिला जात आहे. कोरोना झाल्याची शंका मनात येऊनही त्याच्या भीतीपोटी अनेक जण हॉस्पिटलमध्ये न जाता घरीच थांबले आणि अत्यवस्थ होऊन मरण पावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी शंका उत्पन्न झाल्यास त्वरित तपासणी करून पॉझिटिव्ह असल्यास त्वरित हॉस्पिटल गाठणे आवश्यक आहे. कोरोना आजाराची, त्या नावाची भीतीच अधिक घातक असल्याने समाजमनातील कोरोनाची भीती दूर करण्यालादेखील आम्ही प्राधान्य देत आहोत.प्रश्न- कोरोनासह जगणे आवश्यक झाले असल्याच्या विचाराबाबत तुमचे काय मत आहे?मुथा- कोरोना अजून किती काळ राहील ते सांगणे खरोखरच अशक्य आहे. अजूनही कोरोनाचा सर्वोच्च बिंदू येणे बाकी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत हातावर पोट असणारा माणूस अजून अधिक काळ घरात राहू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या उद्योग, व्यवसाय, नोकरीची फिकीर पडली असल्याने कोरोनासह जगण्याचा सराव करावाच लागेल. केवळ प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक दक्षता घ्यावी, सर्व नियमांचे पालन करावे आणि स्वत:सह कुटुंबाला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.प्रश्न- आतापर्यंत संघटनेच्या कार्याला मिळणारी प्रशासनाची आणि स्थानिक संस्थांची साथ पुरेशी असते का? अपेक्षित ध्येय गाठले गेले असे वाटते का?मुथा- बीजेएस हे केवळ एक नाव असून, सर्व स्थानिक समाजसेवी संस्था आणि प्रशासनाच्या सहकार्यातूनच इतके मोठे काम करणे शक्य झाले आहे. अपेक्षित कार्यापेक्षाही खूप मोठे काम सर्व संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच घडू शकले आहे. मात्र अंतिम ध्येय हे कोरोनामुक्ती हेच असल्याने त्या ध्येयासाठी अजून किमान दोन महिने काम सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे.मुलाखत - धनंजय रिसोडकर, नाशिक
धारावीसह मालेगावचे हॉटस्पॉट नियंत्रणात आणल्याचे समाधान : शांतीलाल मुथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:26 PM
राज्यभरात कोरोनाच्या थैमानाला प्रारंभ झाल्यापासून भारतीय जैन संघटनेसह स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ आणि ‘मोबाइल डिस्पेन्सरी’च्या माध्यमातून २० लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. त्यामुळेच घरोघर जाऊन तपासणी, संशयित तसेच रुग्णांचे वेळीच निदान होऊन पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची ठरली. त्यामुळेच धारावीसह मालेगावचे हॉटस्पॉट नियंत्रणात आणण्यात योगदान देऊ शकल्याचे समाधान असल्याचे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सांगितले.
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या अभियानाचे वैशिष्ट२० लाख नागरिकांपर्यंत सेवाकार्य