तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणींच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात केल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने, शेतीची कामे काहीशी संथगतीने सुरू आहेत. वेळेत मजूर न मिळाल्यास भात लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता बळीराजा करत आहे. म्हणून घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा वापर करून आवणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह परिसरातील वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट, चंद्राचीमेंट, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आवणींच्या कामाला सुरुवात झाली असून, मजूर टंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी देवगांव परिसरातील वाडीपाड्यांमधील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीत वाढ केल्याने बळीराजा चिंतित झाला आहे. मजुरांचा दरदिवसाला २५० रुपये रोज होता, परंतु लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये रोजाने मजुरांची मजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजुरी वाढल्याने हवालदिल झाला असून, घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीची कामांवर जोर दिला आहे. देवगाव परिसरात नागली, वरई, भात या मुख्य पिकांसह कोलम, एक हजार आठ, रूपाली, सोनम, एक हजार दप्तरी या भातांच्या वाणांची लागवड केली जाते.
इन्फो
भाताची रोपे तयार
उशिरा, पण समाधानकारक पाऊस पडत असल्याने व वेळेवर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यामुळे भात लावणीस सुरुवात झाली आहे. मात्र, भात लावणीसाठी मजूरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर देवगाव परिसरातील सर्वच खेड्यापड्यांत लावणीच्या कामांना वेग आला असून, भाताची रोपे तयार झाली आहेत. भातशेती लागवडीची कामे शेतकऱ्यांनी हाती घेतल्याने विहंगम दृश्य शिवारात पाहायला मिळत आहे.
कोट....
बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, आता काहीसा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरातील उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर लावणीचे काम हाती घेतले आहे.
- खंडू देहाडे, शेतकरी, अस्वलीहर्ष