सातपूर विभागीय कार्यालयाला जवळपास वर्षभरापासून पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. अतिरिक्त आयुक्त असलेल्या नितीन नेर यांच्याकडे सद्य:स्थितीत गेल्या पाच महिन्यांपासून सातपूरच्या विभागीय अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभर सोपविण्यात आला आहे. नेर यांच्याकडे मुख्यालयात (राजीव गांधी भवन) सहायक आयुक्त (अतिक्रमण) हा मुख्य पदभार असल्याने त्यांना तेथे थांबावे लागते आणि उरलेल्या वेळात विभागीय कार्यालयाचे कामकाज करावे लागते. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खोळंबतात. विविध विभागांतील समस्या सोडविण्यासाठी, जन्म-मृत्यू दाखल्यांची कामे प्रलंबित राहतात. शिवाय कार्यालयात अधिकारी पूर्णवेळ हजर नसल्याने कर्मचाऱ्यांना मुभा मिळते. या सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी सातपूर विभागीय कार्यालयासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून देण्याची नागरिकांची मागणी आहे.
कोट...
सातपूरला पूर्णवेळ विभागीय अधिकारी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नसल्याने काही कर्मचारीदेखील गायब होतात. कर्मचाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नसतो. याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेणार आहे.
-सलीम शेख, नगरसेवक