सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत नसल्याने यावर्षीही शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांना माघार घ्यावी लागली. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मनसेचे योगेश शेवरे, भाजपाचे रवींद्र धिवरे, तर शिवसेनेचे संतोष गायकवाड हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला होता. या वेळेत भाजपाचे रवींद्र धिवरे आणि शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी माघार घेतली. शेवरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शेवरे यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. या निवडणुकीत सलीम शेख, दिनकर पाटील, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, शशिकांत जाधव, सुदाम नागरे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, अलका अहिरे, विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, भागवत आरोटे, सीमा निगळ, दीक्षा लोंढे आदी सहभागी झाले होते. मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आडके, माजी महापौर अशोक मुर्तडक, संभाजी मोरु स्कर, अनिल मटाले, राहुल ढिकले, रामहरी संभेराव आदींनी शेवरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शेवरे यांच्या समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.मागील वर्षी सातपूर प्रभाग निवडणुकीत मनसेने भाजपाला पाठिंबा दिला होता. ठरल्याप्रमाणे या निवडणुकीत भाजपाने मनसेला पाठिंबा दिला आहे. पुढील तीन वर्षेदेखील मनसे आणि भाजपा एकत्र राहणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली, तर कटुता टाळण्यासाठी सातपूर प्रभाग निवडणुकीत शिवसेनेने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध पार पडली. - विलास शिंदे ,शिवसेना गटनेते
सातपूर प्रभाग सभापतीमनसेचे शेवरे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 1:07 AM