सद्यस्थितीत कोरोना रोगामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. एखाद्या कुटुंबात मृत्यूची घटना घडली तर शंका निर्माण होते .त्यामुळे मदत करण्याऐवजी दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवत असेल? मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत घेऊन गेल्यावर जर अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध नसतील तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते ? याचा विचार न केलेलाच बरे. परंतु वास्तवात अशी परिस्थिती सातपूर स्मशानभूमीत घडत आहे. महानगरपालिकेने मोफत अंत्यसंस्कार योजना लागू केली आहे, परंतु या योजनेलाच हरताळ फासला जात आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी गर्दी होत असून, अशा परिस्थितीत लाकडांची टंचाई जाणवू लागली आहे. लाकडे नसल्याने मृतदेह अन्यत्र न्यावा लागत आहे.
याबाबत संबंधित कुटुंबांनी नगरसेवक सलीम शेख यांच्याकडे तक्रार केल्यानंतर शेख यांनी तत्काळ सातपूर स्मशानभूमीत जाऊन संबंधित ठेकेदाराकडून माहिती घेतली व मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे असले प्रकार होता कामा नये, असे सुनावले. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ताबडतोब लाकडे उपलब्ध करुन देण्यास सांगितले.
इन्फो===
सातपूर अमरधाममध्ये मोफत अंत्यसंस्कारासाठी लाकडे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर स्वतः जाऊन खात्री केली. खरोखरच
लाकडे उपलब्ध नसल्याने सातपूर कॉलनीतील एका मयतावर आनंदवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची सोय उपलब्ध करुन दिली. तर काहींनी स्वतः लाकडे (द्राक्ष बागेतील लाकडे)आणून अंत्यविधी केला आहे. मृत्यूनंतर देखील अशी हेळसांड होत असेल तर मनपा प्रशासन काय करीत आहे?
-सलीम शेख, नगरसेवक.