सातपूर : मागील प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेच्या दोन नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला साथ दिली होती. आता भाजप मनसेला साथ देईल आणि मनसेचा सभापती विराजमान होईल अशी व्यूहरचना करण्यात आल्याने मनसेचे योगेश शेवरे यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले जात आहे तर शिवसेनेकडून मधुकर जाधव यांनीही सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
सातपूर विभागात भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. मनसेचे दोनच नगरसेवक असूनही गेल्या चार वर्षांपासून सातपूर प्रभाग सभापती निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक ठरत आहे. मनसे ठरवेल त्याच पक्षाच्या नगरसेवकाला सभापती व्हावे लागत आहे. महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागात प्रथमच भाजपला सर्वाधिक म्हणजेच नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला दोन जागांवर आणि रिपाइंला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यात पहिल्या वर्षीच्या प्रभाग निवडणुकीत रिपाइंने शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि शिवसेनेचे पक्षीय बलाबलसारखे झाले होते. त्यामुळे अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यानुसार पहिल्या वर्षीचे सभापतिपद भाजपला (माधुरी बोलकर) मिळाले तर दुसऱ्या वर्षीचे सभापतिपद मनसेचे योगेश शेवरे यांना मिळाले होते. तिसऱ्या वर्षी मनसेने तटस्थ भूमिका घेतल्याने त्याचा फायदा शिवसेनेचे संतोष गायकवाड यांना झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
कोविडमुळे प्रभाग सभापतिपदाची निवडणूक लांबली आहे. केवळ सहा महिन्यांसाठी सभापतिपद असण्याची शक्यता आहे. पोटनिवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे मधुकर जाधव आणि मनसेचे योगेश शेवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी (दि.१९) निवडणूक होणार आहे. सरळसरळ निवडणूक झाल्यास भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
चौकट===
महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला ९ जागा,शिवसेनेला ८ जागा, मनसेला २ जागा आणि रिपाइंला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे अवघ्या २ जागा मिळालेल्या मनसेच्या हातात सभापतिपदाचा रिमोट आला आहे. मनसेने पहिल्या वर्षी भाजप मदत केली होती. दुसऱ्या वर्षी मनसेने भाजपची मदत घेतली होती. तिसऱ्या वर्षी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. चौथ्यावर्षी मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता. आता भाजपच्या पाठिंब्याने पुन्हा सभापतिपद मनसेकडे येणार असल्याचे मनसे गटनेते सलीम शेख यांनी सांगितले.