सातपूर : नायलॉन मांजाच्या फासात अडकून जखमी झालेले दोन पारवा पक्षी जिवाच्या आकांताने फडफडत असताना बॉश कंपनीतील कामगारांनी तत्काळ धाव घेत या दोन्ही पक्षांचे जीव वाचविले आहेत.पतंग उडविण्याचा उत्साह शिगेला पोहोचला आणि आकाश रंगीबेरंगी पतंगांनी व्यापले गेले होते. नायलॉन मांजावर बंदी असतानाही विक्रे ता आणि वापर करणाऱ्यांची संख्या खूपच असल्याचे निदर्शनास आले. नायलॉन मांजा वापरू नये म्हणून पोलीस, महापालिका, शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. मात्र या जनजागृतीचा फारसा परिणाम जाणवला नाही. या मायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडले आहेत. पक्षांना मृत्यू मुखी पडावे लागले आहे. तरीही नायलॉन मांजा वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळून आलेले नाही.सातपूर औद्योगिक वसाहतीतील बॉश कंपनीच्या परिसरात नायलॉन मांजाच्या फासात दोन पारवा जातीचे पक्षी अडकून जखमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीतील कर्मचारी पवन अहिरराव आणि सुभाष तिजगे यांनी धाव घेतली. अतिशय उंचीवर असलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडत असलेल्या या पक्षाला मोठी कसरत करून अहिरराव आणि तिजगे यांनी नायलॉन मांजाच्या फासातून या पारव्यांची कशीबशी सुटका केली. त्यातील एक पारवा या मांजामुळे खूपच जखमी झाला होता. त्यास प्राथमिक उपचार करून एका सुरक्षित ठिकाणी ठेवून दिले होते. पवन अहिरराव आणि सुभाष तिजगे यांचे वेळीच लक्ष गेले नसते किंवा वेळेवर मदत केली नसती तर या दोघा पक्षांच्या जिवावर बेतली असती. दोन पक्षांना जीवदान मिळवून दिल्याबद्दल या दोघा कर्मचाऱ्यांचे अन्य कामगारांकडून कौतुक केले जात आहे. (वार्ताहर)
सातपूरला दोन पक्ष्यांना जीवदान
By admin | Published: January 16, 2017 1:18 AM