सातपूर : येथील महानगरपालिकेच्या क्लबहाउसच्या जॉगिंग ट्रॅकवरील क्रीडाप्रेमी व जॉगर्ससाठी उभारण्यात आलेल्या प्रसाधनगृह आणि शौचालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन जॉगर्स ग्रुपच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.सातपूर औद्योगिक वसाहतीतील क्लबहाउसच्या क्रीडांगणावर (जॉगिंग ट्रॅकवर) दररोज सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या संख्येने लहान मुले-मुलींपासून ज्येष्ठ नागरिक जॉगिंगसाठी येतात, तर खेळाडू सकाळ, सायंकाळ सरावासाठी येत असतात. सातपूर परिसरातील हे एकमेव क्रीडांगण आहे. शेजारीच तरणतलाव आहे. या क्रीडांगणावर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय आणि प्रसाधनगृह आहे. मात्र महापालिकेने उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या कारणास्तवर शौचालय आणि प्रसाधनगृहाचा पाणीपुरवठा बंद केला होता. सद्यस्थितीत पाणी पुरवठ्याअभावी सर्वत्र दुर्गंधी पसरली असून, पाणी पुरवठ्याअभावी महिला आणि पुरुष खेळाडूंची हेळसांड होत आहे. शौचालय आणि प्रसाधनगृह परिसराची नियमित साफसफाई करण्यात यावी. जॉगिंग ट्रॅकवर पाणी मारण्यात यावे. बंद पडलेले पथदीप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी दत्तू दरेकर, विनोद आहेर, जगदीश देवडे, दिलीप निगळ, दिलीप गिरासे, एकनाथ तिडके, अश्विनी पाठक, मयुरी मोरे, भूमी सहाणे, शिवाजी भंदुरे, डॉ. शिवाजी दाते, लहानू धात्रक, दिनकर कांडेकर, सुधाकर शिसोदे, काळू काळे, भाऊसाहेब बोडके, अरुण चव्हाण, दीपक पगार, सचिन छाजेड, नीलेश खोडे, अनंत निकुंभ, संजय राऊत आदींसह जॉगर्सप्रेमींनी विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.पाणी नसल्याने अडचणदररोज सकाळी सायंकाळी शेकडो क्रीडाप्रेमी, जॉगर्स, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू या क्रीडांगणावर येत असतात. यात महिला, विद्यार्थिनी, महिला खेळाडू यांचाही समावेश आहे. मात्र या क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची अजिबात सोय नाही. महानगरपालिकेने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.
सातपूरचा जॉगिंग ट्रॅक समस्येच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 12:40 AM