येवला : तालुक्यातील सत्यगाव येथील दोघा आदिवासी बांधवांच्या झोपड्यांना आकस्मिक आग लागून संसारोपयोगी साहित्यासह सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.सत्यगाव येथील विष्णु प्रभाकर बर्डे, भगवान प्रभाकर बर्डे या दोघा भावांच्या झोपड्यांना गुरुवारी (दि. ९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत झोपडीला असणारे बांबू, गव्हाचे व बाजरीचे प्रत्येकी १ पोते, घरात असणारी दहा हजार रूपयांची रोख रक्कम, एक तोळे सोने, २५ किलो तांदूळ, संसारोपयोगी तीस हजाराच्या वस्तू, सर्व कागदपत्रे आदी जळून खाक झाले. दोघांचे सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. लहान-मोठी अशी एकूण १२ माणसे या दोन झोपडीत राहत होती. सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. हाताला काम नसतांना, अशी घटना घडल्याने बर्डे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामसेवक तरवडे यांना पंचनामा करण्याची सूचना केली. शासनाकडून येणारी मदत तात्काळ देऊ व शासनाच्या शबरी घरकुल योजनेतून तात्काळ प्रस्ताव करून बर्डे कुटुंबाला घरकुल मिळवून देणार असल्याचे सभापती गायकवाड यांनी यावेळी सांगीतले.सभापती गायकवाड यांनी बर्डे कुटुंबास वैयक्तिक स्वरूपात तात्काळ किराणा सामान भरून दिले तर सत्यगाव येथील रेशन दुकानदार दिलीप दिवटे यांनी रेशन गहू व तांदूळ दिले. यामुळे बर्डे कुटुंबाला थोडा आधार मिळाला आहे. गावाच्या वतीने लोकसहभागातून संसारोपयोगी साहित्य दिले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सरपंच कामकबाई भवर, उपसरपंच सोपान, पोलीसपाटील अशोक पवार, विठोबा बर्डे, नाना मोरे आदी उपस्थित होते.
सत्यगावला आगीत झोपड्या भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:36 PM
सत्यगाव येथील दोघा आदिवासी बांधवांच्या झोपड्यांना आकस्मिक आग लागून संसारोपयोगी साहित्यासह सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देयेवला तालुका : संसारोपयोगी साहित्याचे नुकसान