नाशिक : शिक्षण हक्क कायद्यात दुरुस्ती करावी या मागणीसाठी अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करून निवेदन देण्यात आले. देशातील प्रत्येक बालकाला अनिवार्य, विनामूल्य, गुणवत्तापूर्वक व समान शिक्षण मिळावे यासाठी त्याचबरोबर केंद्र सरकारच्या शिक्षण हक्ककायद्यात दुरुस्तीसाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यात १ ते १८ वयोगटातील मुलाला बालक म्हणण्यात यावे, बालवाडी ते बारावी मोफत शिक्षण मिळावे, मोफत शिक्षणाची कायद्याने व्याख्या करावी, सर्व शाळांना पूर्ण अनुदानाची तरतूद करावी, कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदि मागण्यांसाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.या आंदोलनात माजी आमदार तथा सभेचे अध्यक्ष जयवंतराव ठाकरे, रामदास भांड, राम गायटे, स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, मिलिंद वाघ, प्रभाताई वायचळे, मधु बोरसे, मुकुंद दीक्षित आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
समाजवादी अध्यापकांचा सत्याग्रह
By admin | Published: November 30, 2015 10:45 PM