नाशिक : नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे अष्टपैलू कामगिरी करून रणजी ट्रॉफी सामन्यात आसामवरील विजयात मोठा वाटा उचलला. ५२ धावा आणि तब्बल ११ बळी अशी कामगिरी केल्यानेच महाराष्ट्र संघाने आसामवर एक डाव आणि ७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
हरियाणातील रोहतक येथे झालेल्या एलिट गटातील ग्रुप जीच्या सामन्यात आसामवर महाराष्ट्र संघाने एक डाव व ७ धावांनी दणदणीत विजय मिळविला . सत्यजितने आठव्या क्रमांकावर ६ चौकार व १ षटकरासह खणखणीत ५२ धावा करताना महाराष्ट्र संघाला पवन शाहच्या साथीने चारशेच्यावर धावा करण्यात मोलाची मदत केली . गोलंदाजीत अतिशय प्रभावी कामगिरी करताना, पहिल्या डावात आसामचे केवळ २५ धावात ४ गडी बाद करून फॉलोऑन देण्यात योगदान दिले . आसामच्या दुसऱ्या डावात देखील अजूनच कमाल करत ४५ धावांत ७ बळी घेतले. सत्यजितच्या गोलंदाजीतील या कळसाध्यायाने आसामच्या फलंदाजीला भुईसपाट केले.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
महाराष्ट्र पहिला डाव सर्वबाद ४१५ - पवन शाह २१९, सत्यजित बच्छाव ५२.
आसाम पहिला डाव सर्वबाद - २४८ . सत्यजित बच्छाव - ११.२-३-२५-४.
आसाम दुसरा डाव (फॉलो ऑन नंतर) सर्वबाद - १६०. सत्यजित बच्छाव - २४-७-४५-७.
महाराष्ट्र संघ एक डाव व ७ धावांनी विजयी .
इन्फो
पुढील सामना विदर्भाशी २४ फेब्रुवारीपासून
सत्यजितच्या महाराष्ट्र संघासाठीच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांना अतिशय आनंद झाला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.