नाशिक : मराठी साहित्यातील मेरूमणी आणि आधुनिक युगाचे कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या नावे नाशिक येथे उभ्या असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आता मराठी भाषा अभ्यास केंद्राची जोड मिळणार आहे. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नाने ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असून हे केंद्र संपूर्णपणे संगणकीय प्रणालीने जोडले जाणार आहे. या कामाची पाहणी आमदार तांबे यांनी केली. विशेष म्हणजे मुंबईत उभारण्यात येणारे मराठी भाषा भवन आणि नाशिकमधील हे केंद्र यांच्यात एकत्रित समन्वय कसा साधला जाऊ शकतो, याबाबतही आमदार तांबे यांनी पुढाकार घेत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली.
मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात नाशिकचे स्थान खूप मोठे आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवले गेलेले कुसुमाग्रज नाशिकचेच! त्याशिवाय ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर हे देखील नाशिकचेच. या दोघांनी नाशिकचं नाव साहित्याच्या क्षेत्रात अग्रणी ठेवलं. तसंच मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म देखील नाशिकचाच आहे. नाशिकचं सार्वजनिक वाचनालय असो किंवा परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यगृह असो, नाशिकसह राज्याच्याही सांस्कृतिक जडणघडणीत या संस्थांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
नाशिकचं हेच सांस्कृतिक वैशिष्ट्य अधोरेखित करत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच महिन्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानअंतर्गत मराठी भाषा अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली. विशेष म्हणजे राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधीही देऊ केला. या कामाची पाहणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावेळी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विलास मुरणारी, अजय निकम, गुरमीत बग्गा, अॅड. काळोगे व राहुल दिवे यांसह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे अद्ययावत भाषा अभ्यास केंद्र लवकरच नाशिककरांच्या सेवेत येईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला.