नाशिक : गेल्या तेरा वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात यंदाही काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा विजय एकतर्फी वा सोपा मानला जात असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी डॉ. तांबे यांनी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष म्हणून पुढे केल्याने काँग्रेसने या निवडणुकीत ‘हात’ दाखवून अवलक्षण केल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत भलेही काँग्रेसने डॉ. तांबे यांच्यावर विश्वास दर्शविला असला, तरी तांबे यांनी पुत्रप्रेमापोटी उमेदवारी नाकारून पक्षाशी प्रतारणा केल्याचे पक्षातच बोलले जात आहे. भलेही सत्यजित तांबे यांच्यासमोर सक्षम उमेदवार नसला तरी अपक्ष म्हणून निवडून येताना तांबे यांना स्वत:ला काँग्रेसी म्हणवून घेणेही अवघड होणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघावर सन २००९ पर्यंत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व स्व. ना. स. फरांदे यांच्या रूपाने कायम होते. त्यानंतर माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, त्याच दरम्यान सोनवणे हे धुळे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत २०१० मध्ये पहिल्यांदाच डॉ. सुधीर तांबे हे अपक्ष म्हणून निवडून आले. वर्षभरानंतर झालेल्या पदवीधरच्या सार्वत्रिक निवडणुकीपासून ते थेट २०२३ पर्यंत तांबे यांनी या मतदारसंघावर वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे यंदाही त्यांनाच पक्षाची उमेदवारी मिळणार असल्याचे गृहीत धरून तांबे यांनी तयारी चालविली होती. तांबे यांना ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यांची तयारी पाहता काँग्रेसने डॉ. तांबे यांच्या उमेदवारीची घोेषणाही केली.
प्रत्यक्षात मात्र गुरुवारी (दि. १२) डॉ. तांबे यांनी पक्षाने दिलेली अधिकृत उमेदवारी नाकारतानाच नामांकन दाखल न करून पक्षादेशदेखील धुडकावला व पक्षापेक्षा पुत्रप्रेमाला महत्त्व देत स्वउपस्थितीत सत्यजित तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजित यांना पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, सर्वच राजकीय पक्षाचे समर्थन मागणार असल्याचे जाहीर केल्याने काँग्रेसवरील विश्वास डळमळीत झाल्याचे मानले जात आहे. पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांच्या इतका सक्षम उमेदवार तूर्त कोणी दिसत नसला व भाजपनेही एक प्रकारे त्यांना ‘बाय’ दिला असला, तरी निवडून आल्यावर तांबे कुणाचे असा प्रश्नही आता पक्ष कार्यकर्ते विचारू लागले आहेत.
सत्यजित तांबे भाजपच्या गळाला?
काँग्रेसचे राज्याचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेेले सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या ‘सिटीझन वील’ नामक पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. तेव्हापासूनच तांबे यांना भाजपने गळ टाकल्याची चर्चा होत असून, भाजपने त्यांना पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली होती. परिणामी डाॅ. तांबे यांना काँग्रेसने उमेदवारीसाठी हिरवा कंदील दर्शविला असतानाही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी दाखल करण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत वाट पाहिली, तर भाजपनेदेखील अखेरच्या दिवसापर्यंत उमेदवाराच्या नावाची घोेषणा केली नाही. काँग्रेसने सत्यजित तांबे यांना उमेदवारी द्यावी यासाठी डॉ. सुधीर तांबे यांनी प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही, तर दुसरीकडे भाजप सत्यजित यांना उमेदवारी देण्यास तयार असल्याने डॉ. तांबे यांनी माघार घेत पुत्राला चाल दिली मात्र भाजपने पिता-पुत्रात फूट पाडल्याची चर्चाही रंगली आहे.