नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यासारखा देशभक्त क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्षात भेटण्याचा आयुष्यात एक नवे तर तीनदा योग आला. त्यांची प्रत्येक भेट अविस्मरणीय अशीच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार श्रीकृष्ण महाराज सिन्नरकर यांनी केले. तसेच ‘सावरकर चरित्रप्रसंग’ विषयावर आपल्या खास शैलीत त्यांनी कीर्तन सादर करून उपस्थितांमधील देशभक्तीचा उत्साह सळसळता ठेवला.निमित्त होते, गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेचे. मंगळवारी (दि. २८) ते बोलत होते. डॉ. वि. म. गोगटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित व्याख्यानात सिन्नरकर महाराज यांनी ‘सावरकर चरित्रप्रसंग’ या विषयावर कीर्तन केले. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जवळून पाहणारा मी एकमेव कीर्तनकार आहे. जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा मी केवळ आठ वर्षांचा होतो. पुण्याच्या शनिवाड्याजवळ त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली. ‘फक्त दहाच मिनिटे बोलणार’ असे सांगत तेव्हा सावरकर दीड तास बोलल्याचे मला आजही लख्ख आठवते. माइक नसूनही त्यांचा खणखणीत आवाजाने त्यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. सावरकर पचविणे कठीण आहे; पण मी सावरकर पचविण्यासाठी जीवन वेचले, असेही सिन्नरकर महाराज यावेळी म्हणाले. दरम्यान, आपले हे अखेरचे कीर्तन असून, यानंतर आपण संन्यास घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. कीर्तनात त्यांना लक्ष्मीकांत भट (गायन), शरद खैरनार (संवादिनी), केतकी गोरे (सतार), पंकज महाले (तबला) यांनी साथसंगत केली.
सावरकर देशभक्तीचा सळसळता उत्साह : सिन्नरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:10 AM