भगूर : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीदिनी सावरकर यांच्याशी निगडित वास्तुंच्या माध्यमातून सावरकर जाणून घेण्याचा भाग म्हणून सावरकर समूहाच्या वतीने परगावातील अभ्यासू व्यक्तींसाठी भगूर दर्शन अभ्यास मोहीम राबविण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वा. सावरकरांच्या १३६व्या जयंतीनिमित्त भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूह भगूर व स्वातंत्र्यवीर सावरकर समूह महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तिसरी ‘भगूर दर्शन अभ्यास मोहिमे’चे आयोजन करण्यात आले आहे. भगूर येथील स्वा. सावरकरांशी निगडित वास्तुंच्या माध्यमातून सावरकर जाणून घ्यायची एक अनोखी संधी सावरकरप्रेमींना त्यानिमित्ताने उपलब्ध होणार असून, त्याची सुरुवात मंगळवार, दि २८ मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यंदा पार्थ बावस्कर (पुणे) यांचे ‘स्वा. सावरकर युवकांचे तेजस्वी स्फूर्तिस्थान’ आणि प्रसाद मोरे (पुणे) यांचे ‘गांधीहत्या आणि निष्कलंक सावरकर’ या विषयावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. भगूर दर्शन मोहिमेत स्वा. सावरकर यांचे बालपण ज्या भगूर शहरात गेले तेथील ऐतिहासिक वाडा, शाळा, महादेव मंदिर, दारणा नदीतीर, राम मंदिर, खंडेराव मंदिर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सावरकर यांच्याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन भगूर समूहाचे मनोज कुवर, प्रशांत लोया, प्रमोद आंबेकर, योगेश बुरके आदींनी केले आहे.
सावरकर जयंतीदिनी भगूर दर्शन अभ्यासाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:14 AM