नाशिक : येथील दारणानदी तीरावरील दशक्रिया विधी घाटच मृत्युशय्येवरच पडला असून, तेथील सभामंडप भटके कुत्रे, डुकरे, भिकारी आणि दारुड्याचे आश्रयस्थान झाले असल्याने क्रियाकर्मासाठी येणाऱ्या नागरिकांना या सर्व यातना सहन करूनच मार्गक्रमण करावा लागत आहे.सावरकर उद्यानासमोर व दारणानदी किनाराच्या सौंदर्यात तत्कालीन खासदार देवीदास पिंगळे याचे निधीतून लाखो रुपये खर्च करून दशक्रिया घाट सभामंडप भगूर पालिकेने बांधला. त्यानंतर मात्र भगूर पालिकेने गेल्या १३ वर्षांपासून या वास्तूकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष न दिल्याने येथील सभामंडपात दिवस रात्र दारुडे व भिकारी झोपतात आणि कुत्रे आराम करतात, तर केसकर्तनासाठी केलेल्या दोन स्लॅपकुटीयाचा वापर जुगार खेळण्यासाठी केला जात आहे. त्याच्या फरशा तोडून टाकल्या असून, कपडे परिधान खोलीच्या बाथरूमचा दरवाजा व खिडक्या चोरून नेल्या आहेत. सर्वत्र वास्तूमध्ये घासगवत उगवले असून, सीमेंटचे ओटे तुटून त्याच्या फरशा उखडून गेल्या आहेत. घाटाच्या एका बाजूची कंपाउंड भिंत तुटून पडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नदीपात्रात आंघोळीसाठी जाण्यासाठी करण्यात आलेल्या पाय-यांचीही दुरवस्था झाली असून, त्यावरही गवत उगल्याने रस्ता बंद झाला आहे. त्याठिकाणी उंदीर, घूस व सापाचे सर्रास दर्शन होत आहे. भगूर पालिकेचे कामगार साफसफाई करत नसल्याने ज्याच्या घरी दशक्रिया विधी होणार आहे त्यांनाच जाऊन अगोदर घाटावर जाऊन साफसफाई करावी लागली आहे. घाटाला लागलेली घर घर पाहता, भगूर पालिकेने निदान आठवड्यातून एकदा तरी, परिसरात स्वच्छता करावी व पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी लोकांनी केली आहे.