नाशिक : सावरकरांचे नाव उच्चारले की त्यांची काही मोजकी रूपे आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. अंदमानच्या तुरुंगात भयानक छळ सोसणारा देशभक्त, समुद्रात उडी घेऊन सुटकेचा प्रयत्न करणारा साहसी वीर, सुंदर देशभक्तिपर गीते लिहिणारा कवी किंवा एक हिंदुत्ववादी नेता, अशी ती रूपे आहेत. परंतु त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या पलीकडे जाणारे बहुविध अंगी होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन शतपैलू या एकाच शब्दांत करता येईल, असे प्रतिपादन नाशिक येथील सावरकर अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक तर्फे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १३८ वे जयंती व अशोक देवदत्त टिळक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने झुम ऑनलाइन ‘शब्दजागर’ व्याख्यानमाला ‘भेटूया घरोघरी’ आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत शतपैलू सावरकर या विषयावर डॉ. पिंपळे बोलत होते. हा कार्यक्रम म्हणजे आधुनिक तंत्र वापरून सावरकर चरित्र कथनाचा अभिनव प्रयोग होता. पिंपळे यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सावरकरांचे चरित्र अत्यंत सखोल पद्धतीने सादर केले. या कार्यक्रमात त्यांनी सावरकरांची अनेक दुर्मिळ छायाचित्रे, तसेच त्यांच्याशी संबंधित व्यक्ती, ठिकाणे आणि वस्तू यांचे मनोज्ञ दर्शन घडविले. सावरकरांनी लंडनहून पाठविलेली पिस्तुले, अंदमानचा तुरूंग, तेथील बेड्या, कोलू, फाशी घर, त्यांची कोठडी, विविध ठिकाणची सावरकर स्मारके आणि सावरकर सदन, त्यांच्या वापरातील वस्तू, त्यांचे हस्ताक्षर अशा अनेक गोष्टी दाखवत आणि योग्य ते विवेचन करीत गिरीश पिंपळे यांनी हा कार्यक्रम रंगवत नेला.
आपल्या भाषणात त्यांनी सावरकरांची समाजसुधारक, वक्ते, द्रष्टे नेते, भाषाशुद्धीचे प्रसारक, निबंधकार, इतिहासकार, नाटककार, राजकीय नेते अशी अनेकविध रूपे उलगडून दाखविली. ते एक विज्ञानवादी नेते होते. त्यांच्या मृत्युपत्रात त्यांनी मांडलेले अत्यंत पुरोगामी विचारही पिंपळे यांनी सांगितले. सावरकरांनी स्वत: लिहिलेल्या तसेच त्यांच्याशी संबंधित अशा साहित्याचीही सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. पिंपळे यांनी या कार्यक्रमात विविध माध्यमांचा वापर केला. सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती, तसेच त्यांचे अत्यंत तेजस्वी असे ‘अनादि मी’ हे गीतही त्यांनी ऐकविले. त्यांच्या ‘संन्यस्त खड्ग’ या नाटकातील ‘शतजन्म शोधितांना’ या अत्यंत गाजलेल्या गीताची झलकही त्यांनी ऐकविली. या अतिशय आकर्षक कार्यक्रमाचा कळस गाठला गेला तो पिंपळे यांनी दाखविलेल्या सावरकरांच्या एका दुर्मिळ चित्रफितीने.
या चित्रफितीत सावरकरांचे दर्शन घडताच रसिक रोमांचित झाले. त्यानंतर पिंपळे यांनी त्यांच्या एका भाषणाची ध्वनिफीत ऐकवत या अभिनव कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक कार्याध्यक्ष संजय करंजकर, परिचय ग्रंथसचिव देवदत्त जोशी तसेच आभार, शब्दजागर संयोजक आणि बालविभागप्रमुख गिरीश नातू यांनी केले.
आजचे व्याख्यान
वक्ते : डॉ. धनंजय केळकर
विषय : कोरोना, चक्रव्यूहाचा भेद