नाशिक : सिडको परिसरातील शिवशक्ती चौकात जगताप कुटुंब वास्तव्यास आहे. गुरुवारी (दि.२९) सकाळी नेहमीप्रमाणे नळांना दैनंदिन पाणीपुरवठा करण्यात आला. यावेळी अमोल जगताप हा पाणी भरण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी अचानकपणे त्याला वीजप्रवाहचा झटका बसला आणि तो अंगणात कोसळला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मदतीला भाऊ धीरज धावून आला आणि त्याने त्यास बाजूला केले मात्र याचवेळी त्यालाही वीजप्रवाहाचा जोरदार झटका लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सिडको भागातील शिवशक्ती चौकात महापालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. यामुळे रस्त्याचे खोदकाम करण्यात आले असून गटारीचे पाइप टाकले जात आहे. खोदकामात महावितरणची भूमिगत वीजवाहीनी तुटल्यामुळे येथील जगताप यांच्या घराच्या आवारात वीजप्रवाह उतरल्याचे बोलले जात आहे. सकाळी नळाला पाणी भरण्याची लगबग सुरु असताना अमोल नानाजी जगताप हा आपल्या आईला मदतीसाठी पाणी भरण्याकरिता घराबाहेर आला. याचवेळी त्याला वीजप्रवाहाचा झटका बसल्याने तो दुरवर फेकला गेला. अमोल अचानक का कोसळला? म्हणून बघण्यासाठी त्याचा भाऊ धीरज नानाजी जगताप (२६्) हा धावला असता त्यालाही वीजप्रवाहचा धक्का बसल्याने तोही कोसळला. अचानकपणे दोघे भाऊ अंगणात कोसळल्याचे लक्षात येताच आजुबाजुच्या रहिवाशांनी धाव घेत दोघांना उचलले. यावेळी दोघांनाही जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. धीरजची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यास जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मात्र रुग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांनी धीरजला तपासून मयत घोषित केले. या दुर्घटनेत मोठा भाऊ अमोलचे प्राण वाचविण्यास थोरल्या धीरजला यश आले असले तरी दुर्दैवाने काळाने जगताप कटुंबियांपासून त्यास हिरावून घेतले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरुंद गल्लीबोळ असल्यामुळे ठेकेदाराने या ठिकाणी जेसीबीचा वापर करत भुमीगत गटारींकरिता खोदकाम करण्याची गरज नव्हती. ठेकेदाराने या दुर्घटनेत जगताप कुटुंबाला आर्थिक मदत देणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलन करु, असे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सांगितले.भाऊ तर होतेच; मात्र एकमेकांचे जीवलग मित्रदोन्ही भाऊ मित्रांसारखे राहत होते. त्यांचा एकमेकांवर प्रचंड जीव होता. दोघेही मुंबईत नोकरीला असून अविवाहित आहे. लॉकडाऊनपासून ते नाशिकला आई-वडिलांकडे आले होते. दिवाळीचा सण आटोपून ते पुन्हा नोकरीसाठी मुंबईला रवाना होणार होते.