नाशिक : निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे शिवारात सतीश मीगल यांच्या वस्तीवर शनिवार दिनांक १९ रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान एक सहा ते सात वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या विहिरीत पडला. दरम्यान, तब्बल दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला बिबट्या विहिरीबाहेर काढण्यात यश आले.
मौजे सुकेणे शिवारातील ओणे रस्त्यावरील सतीश भाऊसाहेब मोगल यांच्या गटनंबर ६९९ मधील विहिरीत नर जातीचा सहा ते सात वर्षे वयाचा बिबट्या आढळला. या बिबट्याने या अगोदर कुत्र्यावर हल्ला चढविला, त्यानंतर तो पळून जाण्याच्या मार्गात विहीर आल्याने तो सतिश मोगल यांच्या विहिरीत पडला. यानंतर मोगल कुटुंबीयाने त्वरित वनविभागाला यासंदर्भात माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ मौजे सुकेने गाठून क्रेनच्या साह्याने पिंजरा टाकत या बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले.
दरम्यान गेल्याच आठवड्यात मौजे सुकेने येथील अभिजीत सुकेणेकर यांच्या वस्तीवर धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाने यश आल्यानंतर अवघ्या पाच दिवसानंतर पुन्हा दुसरा बिबट्या माऊली सुकेने शिवारातच जेरबंद झाल्याने या परिसरात त्यांचा मोठा संचार असल्याचे निष्पन्न झाले आहे.