शिरवाडे वणी : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सविता सुनील निफाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुनंदा दिलीप खैरे यांनी दिलेल्या मुदतीत आवर्तन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी एन. वाय. उगले, सहायक निवडणूकनिर्णय अधिकारी एस.व्ही. जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सर्वांनुमते सविता सुनील निफाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सूचक म्हणून उपसरपंच शरद काळे यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या मुदतीत सरपंच पदासाठी सविता निफाडे यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी सविता निफाडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी संतोष शिंदे, श्यामराव गायकवाड, अश्विनी काळे, प्रतिभा गांगुर्डे, सुरेखा बर्डे, मनीषा बर्डे, भास्कर निफाडे, किशोर निफाडे, सुरेश निफाडे, श्यामराव बर्डे, जितेंद्र निफाडे आदी उपस्थित होते.
कविवर्य कुसुमाग्रजांचे जन्मगाव म्हणून गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असून, हीच परंपरा कायम राखत गाव विकासाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या विविध योजनांची माहिती गावातील प्रत्येकांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध राहील.- सविता निफाडे, सरपंच