लोकमत न्यूज नेटवर्क पंचवटी : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन केवडीबन परिसरातील एका बंद सदनिकेचा कडीकोयंडा दिवसा तोडून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची रोकड व सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत केवडीबनात राहणाऱ्या राजेश प्रभाकर देशपांडे यांनी दिलेल्या तक्र ारीनुसार आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, केवडीबनात राहणारे देशपांडे कुटुंबीय गुरुवारी सकाळी ११ ते १ च्या दरम्यान कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्याच दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद सदनिकेतील फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला व कपाटाचे लॅच उघडून तिजोरीत ठेवलेली दोन लाख रु पयांची रोकड व एक तोळा वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. दुपारी काम आटोपून देशपांडे कुटुंबातील सदस्य घराकडे परतले असता घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला. त्यांनी घरात धाव घेतली असता कपाटाचे दार उघडे दिसले व कपाटातील रोकड, दागिने जागेवर नसल्याने घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे वृत्त कळताच सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, गुन्हा शाखेचे नारायण न्याहळदे आदींनी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी फिंगर प्रिंट व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.
केवडीबनात सव्वादोन लाखांची घरफोडी
By admin | Published: June 23, 2017 4:23 PM