नाशिक : येथील चित्रकार राजेश व प्रफुल्ल सावंत यांना युरोपातील अल्बानिया देशात आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेत सावंत बंधूंनी जलरंगातील प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली. अल्बानियातील तिराना येथे झालेल्या जलरंग चित्रकलेवरील कार्यशाळेत सावंत बंधू विशेष निमंत्रणावरून सहभागी झाले होते. जगातील आठ दिग्गज चित्रकारांसह सावंत बंधूंनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले तसेच प्रात्यक्षिके सादर केली. परीक्षक मंडळाने सर्व चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे मूल्यमापन केले. उपस्थित विद्यार्थी, चित्रकार, रसिकांकडूनही मते संकलित करण्यात आली. संबंधित चित्रकाराचा अभ्यास, प्रयोगशीलता, चित्रशैली, कला अध्यापनाची पद्धत, जागतिक पातळीवरील योगदान या बाबींचे निरीक्षण करून कार्यशाळेच्या समारोपाला सावंत बंधूंना ‘इस्माइल लुलानी’ या जागतिक सन्मानाने गौरवण्यात आले. कार्यशाळेतील प्रात्यक्षिकात राजेश सावंत यांनी घोड्याचे सर्जनशील, भावस्पर्शी चित्रण केले, तर प्रफुल्ल सावंत यांनी त्र्यंबकेश्वरचे निसर्गदृश्य चितारत उपस्थितांची दाद घेतली. यानिमित्त इंटरनॅशनल वॉटरकलर सोसायटी (अल्बानिया) व विझ आर्ट इंटरनॅशनल वॉटरकलर बिनालेच्या वतीने नॅशनल हिस्टोरिकल म्युझिअम आॅफ तिरानामध्ये ५८ देशांतील २१० चित्रकारांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली. त्यांत सावंत बंधूंच्या आठ चित्रांचा समावेश होता. याच संग्रहालयात सावंत बंधू व निवडक चित्रकारांनी सहा फूट उंच व ३५ फूट लांबीचे तिरानाचे सौंदर्य चित्रबद्ध करीत कलाक्षेत्रातील जागतिक एकात्मतेचे दर्शन घडवले. (प्रतिनिधी)
सावंत बंधूंना अल्बानियात पारितोषि
By admin | Published: November 30, 2015 10:41 PM