पाटणे : येथे श्री संत सावता महाराज तसेच महादेव मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.तीन दिवसीय या उत्सवात महंत सुदाम महाराज, महंत रमेशपुरी महाराज, कृष्णदास महाराज नांदेड, बलदेवदास महाराज, डॉ. महंत योगी, विलासनाथ महाराज, रमेश महाराज वसेकर आदी सहभागी झाले होते. पौराहित्य ग्रामपुरोहित योगेश शास्त्री, लक्ष्मीकांत पाठक व विविध गावाहून आलेले ब्रह्मवृंद यांनी केले. यावेळी महंत व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. माजी आमदार पंकज भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, प्रसाद हिरे, बंडूकाका बच्छाव, काशिनाथ पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील आदींनी सोहळ्याप्रसंगी भेट दिली.श्री संत सावता महाराज बांधकाम समितीचे सदस्य पंडित वाघ, माजी प्राचार्य माणिक यशोद, माजी सरपंच नथू खैरनार, कमलाकर खैरनार, प्रकाश पगारे, कैलास शेवाळे, दादाजी जाधव, सुभाष अहिरे, बन्सीलाल अहिरे, ग्रामस्थ व जिल्हाभरातील भाविकांच्या ६५ लाख रुपये देणगीतून मंदिराची उभारणी केल्याबद्दल बांधकाम समिती सदस्यांना सन्मानित करण्यात आले. जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने यजमान महिला व पुरुषांनी भगव्या साड्या व वस्त्र परिधान केले होते. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व परिसर सडा-रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता. तिसऱ्या दिवशी मूर्तींना महाअभिषेक, महापूजा, प्राणप्रतिष्ठा, मंगलाष्टक, कलशारोहण, पूर्णाहुती, आरती करून ह. भ. प. केशव महाराज उखळीकर, बीड यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.
पाटणेत सावता महाराज मंदिर जीर्णोद्धार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:55 PM