नाशिक : ट्यूनिशिया येथे होणाऱ्या डब्लूटीटी युथ कंडेंडर १५ वर्षे वयोगटाखालील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या सायली वाणी व तनिशा कोटेचाची मुलींच्या भारतीय संघात निवड झाली आहे.
या स्पर्धा १३ ते १६ सप्टेंबरदरम्यान होणार आहेत. या संघात पुण्याच्या प्रिथा वर्टीकर व हरियाणाच्या सुहाना सैनी यांचाही समावेश आहे. सायली ही राष्ट्रीय स्तरावर प्रथम मानांकित, तर तनिशा ही तृतीय मानांकित आहे. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून नाशिकच्या टेबल टेनिसपटूंची राज्य व राष्ट्रीय स्तरावर कामगिरी उल्लेखनीय आहे. सायली वाणी हिने मार्चमध्ये इंदोर येथे झालेल्या २०२० च्या राष्ट्रीय अजिंक्य टेबल टेनिस स्पर्धेत सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते, तर तनिशा हिने कांस्यपदक पटकावले होते. तनिशानेसुद्धा याआधी २०१९ मध्ये मस्कद येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड ज्युनिअर सर्किट टेबल टेनिस स्पर्धेत कॅडेट मुलींच्या संघाचे भारताचे प्रतिनिधित्व करून कांस्यपदकही पटकावले होते. जय मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघी नियमित सराव करतात. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा आज नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, तसेच नाशिक जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संघटनेचे मिलिंद कचोळे, सतीश पटेल, अली आदमजी व अभिषेक छाजेड, तसेच प्रशिक्षक जय मोडक आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
दोन मुली प्रथमच राष्ट्रीय संघात
नाशिकच्या दोन मुली एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व पहिल्यांदा करीत आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जर्मनी, उझबेकिस्तान, इजिप्त, अल्जेरिया, घाना, ट्यूनिशिया, मालदीव, बेल्जियम आदी देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.
फोटो
०८सायली, तनिशा