लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री, पुनंद प्रकल्पाचे शिल्पकार ए.टी. पवार यांना हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत दळवट या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.ज्येष्ठ चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व प्रवीण पवार, डॉ. विजया भुसारे, गीता गोळे यांनी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळीस पत्नी शकुंतला पवार, बंधू पांडुरंग पवार आदी परिवारातील सदस्यांसह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, राज्यातील विविध मान्यवरांसह जिल्ह्यातील आजी, माजी आमदार, खासदार तसेच आदिवासी बांधवांसह शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.बुधवारी मुंबई येथे औषधोपचारादरम्यान पवार यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी नाशिक निवासस्थानी तर सायंकाळी दळवट या मूळगावी आणण्यात आल्यानंतर निवासस्थान परिसरात चाहत्यांनी आक्रोश केला. अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. कसमादे पट्ट्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांसह विविध संस्थांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दळवट निवासस्थानी धाव घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.अंत्यदर्शनासाठी कळवण व सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत अत्यंदर्शनासाठी आदिवासी बांधव येऊन आक्रोश करत आठवणींना उजाळा देत होते. पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी जिल्हाभरातून गर्दीचा ओघ वाढत असल्याने सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी मंत्री शोभा बच्छाव, आमदार डॉ. राहुल अहेर, जे.पी. गावित, जयंत जाधव, बाळासाहेब सानप, दीपिका चव्हाण, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, माजी आमदार अनिल अहेर, शांताराम अहेर, दिलीप बोरसे, जयप्रकाश छाजेड, संजय चव्हाण, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे, मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार, उद्योगपती बेबीलाल संचेती, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयश्री चुंबळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी आदींसह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व शासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवरांनी ए.टी. पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
लाडक्या नेत्याला साश्रुनयनांनी निरोप
By admin | Published: May 12, 2017 12:53 AM