नाशिक : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पळशीण येथील धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नावे बोगस धान खरेदी दाखविण्यापाठोपाठ आता सुमारे दहा कोटी रुपये किमतीच्या सुमारे ५२ हजार क्विंटल धानला पाय फुटल्याचे उघडकीस आले असून, कागदोपत्री धान खरेदी करून शासनाची फसवणूक करणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड यांनी दिले आहेत.
गेल्या वर्षी या संदर्भातील तक्रार आल्यानंतर त्याची आदिवासी विकास महामंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील केंद्रांतर्गत येत असलेल्या पळशीण आदिवासी शेतकरी विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावे बोगस धान खरेदी करण्यात येत असल्याच्या प्रकरणात गेल्या महिन्यात चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तर खरेदी केंद्राच्या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या आदिवासी व्यवस्थापकांना निलंबित करण्यात आले होते.
या चौकशीत आढळलेल्या तथ्यांची आणखी सखोल चौकशी करून पाच गुदामांमध्ये ठेवण्यात आलेल्या धान खरेदीची तपासणी केली असता, या गुदामांमध्ये कागदोपत्री ६५ हजार ५०० क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्यातील ५२ हजार ८४० क्विंटल धान गुदामामध्ये आढळूनच आलेले नाही.