त्र्यंबकेश्वर : टंचाईग्रस्त गावांना अद्याप टँकर किंवा अन्य उपाय योजना न केल्यामुळे सभापती ज्योती राऊत, उपसभापती रविंद्र भोये, सदस्य मोतीराम दिवे , व अलका झोले यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत संताप व्यक्त केला. यावेळी गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे यांनी सांगितले की, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठविले आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन अद्याप मंजुर होउन आले नसल्याचे सांगितले.शासनाच्या पत्रबाजीत अधिकारी मात्र शासनाच्याच व्हेरीफिकेशन आदेशाच्या नाट्यात कालापव्यय मात्र करतात. या नाट्यामुळे तहानलेल्या गाव पाडे वाड्यांना वेळेवर पाणी पोहचत नाही. विशेष म्हणजे अजुनही या गावांना पाणी मिळाले नाही. यामुळेच सदस्य संतप्त झाले. या मासिक सभेत पंचायत समितीच्या सर्व विषयांचा आढावा घेण्यात आला. पण पाणी टंचाईने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले असतांना जिल्हा प्रशासनाला ना खेद ना खंत ! पाणी टंचाईमुळे अन्य विषयांवर फारसा उहापोह झाला नाही. त्यातच संपुर्ण त्र्यंबक शहरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने बैठकीला उपस्थितीतांना उष्म्याने हैराण केले. कोणी पुढ्यातील पेपर्सने तर कोणी हात रु मालाने हवा घेत होते. या बैठकीत पाणीपुरवठा योजनेची सुरु असलेली कामे किती योजना सध्या बंद अवस्थेत आहेत. त्या का बंद आहेत. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची किती कामे सुरु आहेत. किती मजुर कामावर आहेत. बाकीचे कामे बंद का आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील जी पाच कामे निवडली आहेत त्यांचा अहवाल तालुका कृषि अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी सादर केल्यावर त्यांनी जलयुक्त शिवार आराखड्यातील सन २०१८-१९ मधील २२ गावे जिल्हा प्रशासनाला पाठविली होती. ती सर्व गावे मंजुर होउन आली असल्याचे सांगितले. ती गावे पुढीलप्रमाणे कौलपोंडा, सावरपाडा, वळण देवळा, वटकपाडा, डोळओहळ, बाफनविहीर, धायटीपाडा, सोमनाथनगर, विनायकनगर, होलदारनगर, हट्टीपाडा, रोहीले, निरगुडे (ह), गारमाळ, झारवड खु., भिलमाळ, पहिने, दिव्याचा पाडा, धुमोडी , पेगलवाडी (ना), मेट चंद्राची यांचा समावेश आहे.
टंचाईग्रस्त गावे टॅँकरपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:26 PM