नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भागातील नागरीकांना पाण्याचे महत्व समजावयाचे असेल तर लादलेली टंचाई हा प्रयोग योग्य असल्याचे मत जल चळवळतील कार्यकर्ते आणि सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी केले. रविवारी (दि.२२) जलदिन आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकमतने संवाद साधला. त्यावेळी ही माहिती दिली.
प्रश्न- सर्वच शहरात विशेष महापालिका क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळपट्टी होते, त्याबद्दल काय सांगाल?निर्मळ: शहरी भागात लोकसंख्या जास्त असते आणि लोकांची घनता असल्याने सरकारचे शहरी भागाताकडे विशेष लक्ष असते. शहरी भागात पाणी पुरवठ्यासाठी विशेष लक्ष पुरवले जाते. पाणी पुरवठा योजनांसाठी निधीही दिला जातो राज्यात बहुतांश महापालिकांच्या धरणातून थेट जलवाहिनी योजना आहेत. मात्र त्यानंतरही शहरी भागात पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. मुबलक पाणी असेल तर त्याचे महत्व राहात नाही त्यामुळे पाण्याची उधळपट्टी होते.
प्रश्न: शहरी भागात देखील पाणी पुरवठा विस्कळीत होतो ना?निर्मळ : शहरी भागात मुबलक पाणी पुरवठा होत असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पायाभूत सुविधा कशा आहेत, त्यावर खूप अवलंबून असते. शहरात मुबलक पाणी असले तरी त्यात अनेकदा विषमता असते. कमकुवत पायाभूत सुविधांमुळे असे घडते. ज्या भागात ओरड होते. किंवा नगरसेवक ओरड करतात. त्या भागात जादा पाणी पुरवले जाते. अन्य भागात मात्र तसे होत नाही. त्यामुळे ही एक मोठी समस्या आहे.
प्रश्न: जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने अनेक नियम केले आहेत. दरडोई पाणी ुपुरवठ्यात घट केली आहे. त्यामुळे उधळपट्टी थांबेल अस वाटते का?निर्मळ: जलसंपत्ती नियामक प्राधीकरणाने अनेक नियम केले आहेत. त्याअंतर्गत ५० लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांना दीडशे ऐवजी १३५ लिटर्स दरडोई पाणी पुरवठा करऱ्यात येणार आहे. तथापि, केवळ कायद्याची आदर्श अंमलबजावणी झाली असती तर रामराज्य निर्माण झाले असते. पाण्याची उधळपट्टीत थांबवायची असेल तर लोकशिक्षण करण्याची गरज आहे. आणि ती होत नसेल तर लादलेली टंचाई हा प्रयोग नागरीकांना निश्तिचत धडे देईल. एक मात्र नक्की की या सर्व बाबींचा निरंतर विचार व्हायला हवा. केवळ जलदिन साजरा करण्याचे सोपस्कार शासकिय यंत्रणांनी करू नये तर पाणी बचतीचे महत्व निरंतर असावे. तर बचतीची सवय लागेल.मुलाखत- संजय पाठक