लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यात भेडसावणारी पाणीटंचाई व त्यावर करावयाच्या उपाययोजना या विषयावर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या उपस्थितीत खातेप्रमुख, अधिकारी, लोकप्रतिनिधी व जनतेची एकत्रित टंचाई आढावा बैठक संपन्न झाली.पेठ तालुक्यात टंचाईग्रस्त गावांनी शंभरी गाठली असून, अनेक गावांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई आराखडा तयार करून शासनाला सुपूर्त केला असला तरी टॅँकर मंजुरी लाल फितीत अडकल्याने अद्यापही गावांना टॅँकर सुरू होऊ शकले नसल्याने ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. तालुक्याच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन पाणीसंकट दूर करावे, असे आवाहन शीतल सांगळे यांनी केले.जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट गावे शासनदरबारी टंचाईमुक्त घोषित करण्यात आली असली तरी अशा गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य सुविधा, दळणवळण, पशुवैद्यकीय, एकात्मिक बालविकास, शिक्षण, ग्रामपंचायत घरकुल योजनांचा विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. या प्रसंगी शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार, जि. प. सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित, सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, पुष्पा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, गटविकास अधिकारी भालचंद्र बहिरम यांच्यासह विभागप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
टंचाई आढावा बैठक
By admin | Published: May 09, 2017 1:14 AM