खमताणे : बागलाण तालुक्याच्या पाचवीला वर्षानुवर्षे दुष्काळ पूजलेला आहे. यामुळे शेतात कोणतेच काम नसल्याने मजूर लावायची वेळच येत नाही. पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बांधकाम व्यावसायिक, दूध, पोल्ट्री, शेतीव्यवसायाला त्याचा थेट फटका बसत आहे. त्यामुळे ऊसतोड आणि बांधकाम मजूर कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत.ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेलेले मजूर चालू वर्षी लवकर पट्टा पडल्याने घरी लवकर आले आहेत. कारखाना चालू असताना उपजीविका भागत होती; मात्र घरी आल्यानंतर एकेका कुटुंबात पाच सहा व्यक्ती असल्याने गुजराण करायची कशी, हा प्रश्न दररोज कुटुंबप्रमुखांना सतावत आहे.बांधकामाला लागणारे पाणीच उपलब्ध नसल्याने बांधकाम व्यवसाय ९० टक्के बंद आहे. त्यामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे सीमेंट कामगार, बांधकाम कामगार, प्लंबर, वीटभट्टीवरील मजूर कामगार अशा हजारो कारागीर व मजुरांच्या हाताला काम उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.ऊसतोड हंगामात यापूर्वी कुटुंबातील शाळकरी मुलांनाही आपल्या सोबत नेणारे मजूर सद्यस्थितीत मात्र आपल्या कुटुंबातील वृद्ध व्यक्तींना मुलांसोबत घरीच ठेवून त्यांची शाळा बुडणार नाही, याची काळजी घेताना दिसतात. पाच ते सहा गावे सोडून पोटापाण्यासाठी ऊसतोडीवर गेलेले हे कामगार आता आपापल्या गावी परतू लागले आहेत. आजवर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मिळणाऱ्या उसाच्या बांड्यामुळे गुराढोरांच्या चारापाण्याचा काही काळासाठी का असेना मिटलेला प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दुष्काळामुळे कामाचा तुटवडा; मजुरांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 6:12 PM