लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून इगतपुरीच्या पूर्वभागातील साकूर व लगतच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार होत आहे. साकूर भागात उसाचे पीक जास्त प्रमाणात असल्याने भरदिवसा नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडल्याच्या घटना होत आहेत. सध्या या परिसरात भात लागणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने शेतकरी बांधवांना व महिला भगिनींना जीव मुठीत धरून काम करावे लागते. सायंकाळी दिवस बुडण्याच्या आत उजेडातच हातचे काम सोडून घरी परतावे लागते.रोजंदारीचे मजूर असल्याने कमी तासाचे काम करून नाइलाजास्तव सुट्टी घ्यावी लागत असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तालुक्यात सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेती बांधवांना भातलावणीसाठी विद्युत पंप सुरू करण्यासाठी नदी, विहिरीवर रात्री-बेरात्री जावे लागते. अशातच बिबट्याचे दर्शन घडल्याचे शेतकरी बांधव सांगतात. मळयात वास्तव्य असणार्या शेतकरी बांधवांना दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वास्तव्याच्या ठिकाणच्या शेतकरी बांधवांना त्यांच्या घरातील लहान मुला मुलींना हातचे काम सोडून जबाबदारीने गावातील बसपर्यंत ने आण करावी लागत आहे. तसेच मळयात पाळलेली जनावरे गाय म्हैस बैलजोडी शेळया मेंढया कुक्कुटपालन व्यावसायिक यांना त्यांच्या संगोपनासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.अशीच घटना साकुर कवडधरा रोडवर शेतजमीन असलेल्या शेतकरी ईश्वर सहाणे यांच्या बाबतीत घडली असून रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यांचे डोळयादेखत त्यांचा दावणीला बांधलेला दीड वर्षाचा गोर्हा (बैल)मानेला धरून हिसकावून बिबटयाने नेला.त्याचा पंचनामा देखील झालेला आहे.एकंदरीत नागरीक व जनावरांच्या सुरिक्षततेसाठी बिबटयाचा संचार असलेल्या परिसरात संबंधित वनविभागाने पिंजरा लावून बिबटयाचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन संभाजी ब्रिगेड च्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मिलिंद कुकडे यांनी दिला आहे.
साकूर परिसरात बिबट्याची दहशत
By admin | Published: July 10, 2017 11:47 PM