नाशिक : राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी मराठी माणूस म्हणून आपला एक वेगळा ठसा पोलीस दलात उमटविला होता. त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारी जगतात आपल्या धाडसी कारवाईने धडकी भरविली होती. कवीमनाचा पोलीस अधिकारी राज्याने गमावल्याची खंत शोकसभेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बोलून दाखविली.कुसुमाग्रज प्रतिष्ठान, सार्वजनिक वाचनालय आणि वसंत व्याख्यानमालेच्या वतीने राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रारंभी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी इनामदार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, मुंबईतील अंडरवर्ल्डचे त्यांनी कंबरडे मोडले.इनामदार हे कलावंतांमध्ये रमायचे. कला हा त्यांचा अविभाज्य भाग होता. ते कुसुमाग्रजांचे निकटवर्तीय होते पण त्यांना कधीही कुसुमाग्रजांच्या नावाने पुरस्कार मिळाला नाही, अशी खंत व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी शोकसभेत व्यक्त केली. यावेळी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष संजय पाटील, सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे, जयप्रकाश जातेगावकर, संगीता बाफना, मीना परुळेकर, लोकेश शेवडे, बाळासाहेब देशपांडे, सुनीता जरांदे, व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार आदी उपस्थित होते.
‘अंडरवर्ल्डला धडकी भरविणारा अधिकारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:07 AM