नाशिक : महापालिकेने आठ महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई करत अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविल्यानंतर पुन्हा एकदा भंगार बाजाराने हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. रहिवासी वापरासाठी असलेल्या जागांवर भंगार मालाचा व्यवसाय थाटणाºया विक्रेत्यांना महापालिकेने पुन्हा एकदा कारवाईचा अल्टिमेटम दिला असून, त्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त मागविला आहे. दरम्यान, महापालिकेने आराखडा तयार करत कारवाईची तयारी चालविली आहे. त्यामुळे पितृपक्षातच भंगार बाजारावर हातोडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उच्च न्यायालयात अंबड-लिंकरोडवरील बहुचर्चित अनधिकृत भंगार बाजार हटविण्यासाठी जनहित याचिका दाखल झालेली होती. या जनहित याचिकेनुसार ५२३ अनधिकृत शेड दर्शविण्यात आले होते. नंतर महापालिकेने सर्व्हे केला त्यावेळी त्यात नव्याने २४० अनधिकृत लोखंडी शेड आढळून आल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेने एकूण ७६३ अनधिकृत भंगार बाजाराचे शेड हटविण्यासाठी दि. ७ ते १० जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविली होती. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात ही सर्वात मोठी अतिक्रमणविरोधी कारवाई ठरली होती. या कारवाईनंतर महापालिकेने सदर जागेवरील भंगार माल शहराबाहेर हटविण्याचे आदेश संबंधित व्यावसायिकांना दिले होते. त्यानुसार, काही व्यावसायिकांनी आपला माल अन्यत्र हलवलाही परंतु, बव्हंशी व्यावसायिकांनी पुन्हा एकदा तात्पुरत्या स्वरूपातील शेड उभारून आपले व्यवसाय थाटले. महापालिकेने संबंधित व्यावसायिकांना सदर व्यवसाय बंद करण्याबाबत वारंवार सूचना दिल्या परंतु, त्याला व्यावसायिकांनी दाद दिली नाही.
भंगार बाजारला पुन्हा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:21 AM