लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील विखरणी येथील पाझर तलावाला असलेल्या सांडव्याच्या भिंतीची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.विखरणी शिवारातील गोरखनगर रस्त्यालगत गाव परीसरातील सर्वात मोठा पाझरतलाव असून गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे ७० टक्के क्षेत्र या पाझर तलावाच्या पाण्याने ओलिताखाली येते. मात्र, गत दोन वर्षापासून पाझरतलावाच्या सांडव्याची भिंत फोडण्यात आली असून त्यामुळे पाझर तलावाची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे ओलिताखालील क्षेत्रात देखील घट झाली आहे. पाझरतलावातील पाण्याच्या लाभापासून अनेक शेतकरी वंचित रहात असल्याने शासकीय नियमानुसार पाझर तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ववत करण्यात यावे, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.या पाझर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढली तर सर्वच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सदर पाझर तलावाच्या सांडव्याचे बांधकाम त्वरीत करण्यात यावे, भिंतीची उंची वाढवावी, अशी मागणी कौतिक पगार, बापूसाहेब शेलार, रवी रोठे, अशोक कोताडे, नवनाथ पगार, जालिंदर शेलार, नवनाथ गोडसे, पांडूरंग कदम, केशव पगार आदींनी केली आहे.