नाशिक : शिक्षण विभागाने पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून त्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून शिक्षण विभागासमोर ऑनलाइन परीक्षेचा विचार असताना त्याचा विचार न करता थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा असल्याचे मत पालकांमधून उमटत आहेत. शिक्षण विभागाने शालेय परीक्षा रद्द केल्या असल्या तरी शिष्यवृत्ती परीक्षा रद्द केलेल्या नाही. पूर्वी २५ एप्रिलला होणऱ्या या परीक्षा आता २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या परीक्षा होते मग शाळेची का नाही? असा सवाल उपस्थित करतानाच पालकांनी शिष्यवृत्ती परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घ्यावी, असे मत व्यक्त केले आहे. तर आरटीईनुसार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही, त्याचप्रमाणे नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना १७ नंबर अर्जाद्वारे बारावीची परीक्षा देण्याची सुविधा आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शिक्षक वर्गाकडून परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले जात आहे. पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेला समोरे जाऊ शकणार नाही? त्यामुळे या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घ्याव्या लागणार आहे. त्यामुळे या परीक्षा आणखी पुढे ढकलाव्यात अथवा रद्द कराव्या याविषयी शिक्षण विभागाला निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
पॉइंटर
वर्ग-विद्यार्थी संख्या
पहिली- ११७०५ दुसरी - १२१३४२ तिसरी- १२०६१८
चौथी-१२३९३९
पाचवी-१२२७४३
सहावी- १२०६४५
सातवी- ११८३३२
आठवी-११५९१०
नववी-१११४२१
अकरावी-६८१६०
--
ही ढकलगाडी काय कामाची ?
गेल्या वर्षभरात सलग महिनाभरही शाळा सुरू राहिल्या नाही. असे असतानाही शाळांनी संपूर्ण शुल्कासाठी आग्रह धरला मात्र परीक्षांसाठी नाही. गेल्या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षणात मुले काय शिकली हे समजण्यासाठी किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे अपेक्षित होते. मात्र शिक्षण विभागानेही ही बाब गांभीर्याने घेतली नाही, मुलांच्या शिक्षणात अशाप्रकारची ढकलगाडी काय कामाची, अशी प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत असून, शिक्षण विभागाने सर्वच परीक्षांसाठी ऑनलाइन परीक्षांच्या पर्यायांचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत पालकांकडून व्यक्त होत आहे.
--
तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया-
पाचवी, आठवीचे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षा देऊ शकणार नाही, त्यामुळे ऑफलाइन परीक्षांचाच पर्याय आहे. परंतु सद्यस्थितीत दहावी आणि बारावीच्याच परीक्षाविषयी आव्हानात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकल्याचा अथवा रद्द करण्याचे पर्याय आहे.
- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाएसो
--
सर्व शैक्षणिक परीक्षांविषयी शिक्षण विभागाने एकाचवेळी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. कोणतीही एक परीक्षा घेणे आणि परीक्षा रद्द करणे यामुळे संकटापासून बचाव करणे शक्य होणार नाही. परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ, विद्यार्थ्यांचा प्रवास, परीक्षेचा कालावधी यासह आवश्यक यंत्रणांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित आहे.
- नंदलाल धांडे, अध्यक्ष, खासगी प्राथमिक शिक्षक संघ
--
पहीली ते नववीपर्यंत सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शासनाने याचवेळी शिष्यवृत्ती परीक्षेविषयीही निर्णय जाहीर करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही, त्यामुळे या परीक्षा आणखी पुढे ढकलल्या जाणार की रद्द होणार याविषयी अद्याप स्पष्टता नसल्याने विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्येही संभ्रम आहे. सद्यपरिस्थितीत शिष्यवृत्ती परीक्षा होणार असतील तर शालेय परीक्षा रद्द करण्यातही काय अर्थ आहे.
पल्लवी शिंदे, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक
पालकांच्या प्रतिक्रिया
कोरोनाचे कारण सांगून शिक्षण विभागाने पहिली ते नववी आणि अकरावीच्याही परीक्षा रद्द केल्या . यातील काही वर्गांच्या ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य होते. मात्र या या पर्यायाचाही विचार झाला नाही. असे असताना कोरोनाचा प्रसार वाढत असताना शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन काय साध्य होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अथवा रद्द कराव्यात
- अंजली पवार, पालक
--
शिष्यवृत्ती परीक्षा होणार असेल तर शालेय परीक्षाही होणे अपेक्षित आहे. शालेय परीक्षा किमान ऑनलाइन पद्धतीने तरी होणे आवश्यक होते. ऑनलाइन शिक्षण शक्य आहे तर परीक्षा का नाही. मात्र शिक्षण विभागाने आणि शाळांनी शालेय परीक्षांकडे सरळ दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत पालकांवर संपूर्ण शुल्क भरण्याचा शाळांकडून दबाव आणला जात आहेे.
-राजेंद्र जाधव, पालक