नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. मात्र यंदा परिषदेने प्रथमच अनधिकृत निकाल जाहीर केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कळूनही केवळ अंतिम निकाल जाहीर नसल्यामुळे त्यांना त्यांचा आनंदही व्यक्त करता येईना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यृवत्ती परीक्षेचा निकाल परिषदेने संकेतस्थळावर जाहीर केला आहे. मात्र हा अंतरिम निकाल आहे. म्हणजेच जो अंतिम निकाल म्हणता येणार नाही. संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला हा निकाल विद्यार्थ्यांना बघता येतो, मात्र जोपर्यंत अंतिम निकाल जाहीर होणार नाही तोपर्यंत मिळालेल्या निकालाचा आनंदही व्यक्त करणे विद्यार्थ्यांना कठीण झाले आहे. अंतरिम निकाल जाहीर करण्यामागे परिषदेने अचूक निकाल देण्याचे कारण पुढे केले आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात चूक राहू नये, तसेच त्यांना निकालपत्रातील काही विषयांतील गुणांबाबत शंका असेल किंवा त्यांना पुनर्मूल्यांकन करावे, असे वाटत असेल तर त्यांना ही संधी मिळावी आणि पालकांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतरच म्हणे अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. वास्तविक अंतरिम प्रवेशाची यादी यापूर्वी ऐकविता येत होती. कोणत्याही विद्याशाखेत प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या नावात, जातीच्या उल्लेखात, जन्मतारखेत तसेच विषयांमध्ये काही त्रुटी राहू नयेत म्हणून अंतरिम यादी प्रसिद्ध केली जाते. त्यातील त्रुटी दूर झाल्यानंतर अंतिम प्रवेश यादी जाहीर केली जाते. मात्र इथे तर निकालच अंतरिम जाहीर करण्यात आला आहे. वास्तविक निकालानंतरही पुनर्मूल्यांकन, गुणपडताळणीची प्रचलित पद्धत असताना आणि त्यामुळे गुणांकांमध्ये फारसा फरक पडत नसतानाही परीक्षा परिषदेने प्रवाहविरोधात निर्णय घेऊन काय साधले, असा प्रश्न पालक विचारत आहेत. ----चुकीचा निर्णयनिकाल जाहीर झाला मात्र अधिकृत नाही ही अजबच तऱ्हा म्हणता येईल. जिल्हा परिषदेलाही याबाबतीत पुरेशी माहिती नसल्याने त्यांचाही गोंधळ झालेला दिसतो. निकालानंतर जाहीर निकालात फारसा फरक पडेल, असे वाटत नाही. - नंदलाल धांडे, सचिव, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ
शिष्यवृत्ती : अनधिकृत निकाल जाहीर करण्याची अजब तऱ्हा
By admin | Published: May 22, 2017 3:17 PM