नाशिक : समाज सुशिक्षित जरी होत असला तरी बेरोजगारी अधिक वाढत आहे. कारण आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये काळानुरूप बदल अद्याप होत नसून केवळ पदव्यांचे कागद घेऊन सुशिक्षित तरुण नोकऱ्यांचा शोध घेताना दिसतात; कौशल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीद्वारे बेरोजगारीवर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. अनिल पाटील (जैन) यांनी केले.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ नाशिक संचलित प.पू. श्री प्रीतिसुधाजी शिक्षण फंड संस्थेच्या वतीने रविवारी (दि.५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शिष्यवृत्ती, शैक्षणिक व कौशल्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षसस्थानी मनीष सोनमिंढे, उद्योजक दिनेशकुमार कुवाड, प्रितीसुधाजी शिक्षण फंडचे अध्यक्ष मोहनलाल लोढा, संघपती राजमल भंडारी, विजय बेदमुथा, जवहरीलाल भंडारी, शांतीलाल हिरण, दत्तात्रय बच्छाव, डॉ. प्रदीप भंडारी, आशिष भन्साळी, लताबाई लोढा, प्रमीला पारख आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पाटील म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर मोर्चे, आंदोलने केली जात आहे, ते केवळ समाजाच्या प्रगतीसाठी. एकूणच वाढती लोकसंख्या, नोक-यांचे घटते प्रमाण आणि सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या यामुळे संघर्ष निर्माण होताना दिसत आहे. शालेय शिक्षणपद्धतीपासून काळानुरूप बदल गरजेचे आहे. कौशल्य ज्यांच्याकडे आहे, तेच प्रगती करू शकतात त्यामुळे कौशल्याधिष्ठित शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोनमिंढे यांनीही उपस्थित पुरस्कारार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत आयुष्यात येणाºया संकटांवर आपल्या इच्छाशक्ती जिद्दीच्या बळावर मात करावी, असे आवाहन केले. दरम्यान, पाटील यांना शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. कन्हैयालाल बलदोटा परिवाराच्या वतीने दिल्या जाणा-या ‘कौशल्य पुरस्कार’ने गौरविण्यात आले. ११ हजार रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच २७ विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. दरम्यान, यावेळी समाजातील गरजुंना शिक्षणासाठी हातभार लागावा, याकरिता फंडच्या माध्यमातून सुमारे आठ लाखांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रास्तविक अॅड. विद्युलता तातेड यांनी केले. सूत्रसंचालन, सतीश कोठारी, प्रा.लोकेश पारख यांनी केले.