नाशिक : तब्बल नऊ महिने ज्या भिंती, बेंचेस, फळे अबोल होते, त्या प्रत्येक निर्जीव वस्तूला जणू कंठ फुटला आणि त्या सचेत झाल्यासारख्या त्यांच्यातून स्वर बाहेर पडू लागले. तब्बल नऊ महिन्यांनंतर शाळेची घंटा वाजली आणि सर्व शासकीय, खासगी, इंटरनॅशनल माध्यमिक शाळांमध्ये चैतन्य सळसळू लागले. नवीन वर्षातील आठवड्याच्या पहिल्याच दिवसापासून भरलेल्या नववी, दहावीच्या वर्गांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी, बारावीच्या वर्गांनी सर्व शाळा, कॉलेजेसचा परिसर सोमवारी (दि.४) पूर्वीप्रमाणेच गजबजून गेला होता.
शहरासह जिल्हाभरातील शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असून, तब्बल नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या. प्रत्येक शाळेमध्ये येणाऱ्या मुलांनी त्यांच्यासमवेत पालकांचे संमतीपत्र आणणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना गेटच्या आत प्रवेश देण्यापासून सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यात आले. मास्क घातलेल्या विद्यार्थ्यांनाच गेटमधून प्रवेश दिला जात होता. तसेच प्रत्येक शाळेच्या गेटवरच विद्यार्थ्यांसाठी सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या होत्या. तर बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थी आत आल्यानंतर त्यांना स्वच्छतेच्या सर्व सूचना, सॅनिटायजेशन व्यवस्था तसेच पूर्णवेळ मास्क तोंडावर ठेवणे बंधनकारक असल्याच्या सूचना देण्यात आल्या. गेल्या नऊ महिन्यांपासून ओस पडलेल्या सर्व शाळा पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणीसह जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक शाळेतील आवश्यकतेनुसार विज्ञान, इंग्रजी व गणित विषयांच्या शिक्षकांसह शिपाई, कारकून आणि मुख्याध्यापक अशा सहा कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, आवश्यकतेनुसार शिक्षकांची कोरोना चाचणी करूनच सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
इन्फो
प्रारंभी केवळ तीन तास शाळा
शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करताना, केवळ तीन तासिकांचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून केवळ सकाळी ८ ते ११ इतकाच काळ शाळा सुरू राहणार आहेत. उर्वरित विषयांचा अभ्यासक्रम ऑनलाइनद्वारेच शिकविण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नाशिक शहरातील काही खासगी शाळांनी सर्व विषयांचे वेळापत्रक जाहीर करून ऑनलाइन शिक्षण बंद करण्याच्या तयारीत आहेत.
इन्फो
पी. ई. स्कूलमध्ये औक्षण
नाशिकरोडच्या पुरुषोत्तम इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे औक्षण करून स्वाग करण्यात आले. बालवाडी किंवा पहिलीच्या वर्गात प्रथमच शाळेत येणाऱ्या नवागत बालकांप्रमाणे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांचेदेखील स्वागत करण्यात आाल्याने शाळेत येण्यास मिळाल्याचा आनंद व्दिगुणित झाला होता. त्यांचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वहात होता.
इन्फो
नियमावली पालनाचे बंधन
शाळा सुरू करताना सर्व शाळांनी त्यांना घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करतानाच सर्व विद्यार्थी व पालकांनीदेखील नियमावलींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यात कोणत्याही शाळेत मधली सुट्टी दिली जाणार नसल्याने विद्यार्थ्यांनी घरूनच पाण्याची बाटली आणणे, शाळेच्या आवारात फिरायचे नाही, शाळा सुटल्यावर थेट घरी जायचे हे सर्व नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.